- चंद्रकांत मांडेकर
चाकण (पुणे) : औद्योगिक वसाहत वाढत असल्याने शेती कमी होत आहे. परंतु काही शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतात वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली आहे. चाकण येथील प्रगतशील शेतकरी सुरेश परदेशी यांनी आपल्या शेतात अकरा गुंठ्यात ड्रॅगन फ्रुटची यशस्वी शेती केली आहे. बदललेला निसर्ग आणि हवामान, पावसाची अनियमितता, वाढलेले रोग यामुळे शेतकरी संकटाच्या चक्रात अडकला आहे. शेतकरी पर्यायाच्या शोधात असताना चाकण येथील उद्योजक शेतकरी सुरेश परदेशी यांनी अकरा गुंठ्यात माळरान जमिनीवर परदेशात येणारे सेंद्रिय ड्रॅगन फ्रूट शेती फुलवली आहे.
दोन वर्षांपूर्वी लावलेली झाडांना या वर्षी एक टन उत्पादन मिळाले आहे. सुरेश परदेशी यांनी लागवड केलेल्या ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन सुरूझाले आहे. पहिला तोडा एक टन किलोचा झाला. त्याला १२० रुपये किलो भाव मिळाला. 'ए' ग्रेडचा माल होता. सहा महिने उत्पादन चालू राहणार आहे. सुरेश परदेशी हा चाकण शहरातील प्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यांनी वडिलोपार्जित शेती विकसित केली. पाणीसाठा करण्यासाठी शेततळे घेतले.
दोन वर्षांपूर्वी अकरा गुंठ्यात परदेशात येणारे ड्रॅगन फ्रुटची दहा बाय सहा अंतरावर माती बेडवर लागवड केली. अकरा गुंठ्यात ६०० रोपे बसली. त्यासाठी १५० पोल आणि रिंग उभे करण्यात आले. एका पोलभवती चार रोपे लावलीत, पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन केले. सरासरी अकरा गुंठ्यासाठी १लाख ५० हजार रुपये खर्च आला. आता पहिलेच उत्पादन सुरू झाले असून यावर्षी रोपे लहान असल्याने एक टन उत्पादन निघाले आहे. दुसऱ्या वर्षी दीड टन उत्पादनाचा अंदाज आहे. आपल्या भागात पाणी कमी असते. त्यामुळे ड्रॅगन फ्रुट लागवडीचा त्या वेळी संकल्प केला होता.
ड्रॅगन फूटच्या फुलांमधील मध गोळा करण्यासाठी मोठ्या संख्येने मधमाशी येतात त्या दुसरीकडे जाऊ नये यासाठी मधमाशी पालन सुरू करतो आहे. त्यापासून वेगळे उत्पादन मिळणार आहे. म्हणजे एका उत्पादनात दुहेरी फायदा घेता येत आहे. कमी पाणी आणि मुरमाड जमिनीवर ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेऊन शेतकरी लाखो रुपये कमवू शकतात.
- सुरेश परदेशी, प्रगतशील शेतकरी