प्रयोग म्हणून धाडस केलेल्या ड्रॅगन फ्रूट शेतीतून अल्पावधीत लक्षवेधी यश मिळवत सरला व जगन्नाथ चव्हाण हे दांपत्य आज चाळीतून दुमजली बंगल्यात वास्तव्यास आले आहे. यासोबतच त्यांच्या मार्गदर्शनाने परिसरातील अनेक शेतकरी आज ड्रॅगन फ्रूटची शेती करत आहे.
नाशिक जिल्ह्यांतील रायते (ता. येवला) येथील सरला आणि जगन्नाथ चव्हाण दांपत्याची वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. ज्यात मका, कांदा व इतर काहीअंशी भाजीपाला पिके ते घेत. मात्र उत्पादन खर्च व उत्पन्न यांचा ताळमेळ म्हणावा तसा बसत नव्हता. तेव्हा जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या द्राक्षलागवडीचा प्रयोगही त्यांनी केला. मात्र त्यातही फारसे यश त्यांना मिळाले नाही. दरम्यान दुरचित्रवाणीवर ड्रॅगनफ्रूट शेतीची माहिती त्यांच्या पाहण्यात आली. बाजारातील मागणी, कमी जोखीम आदींचा विचार करून त्यांनी ड्रॅगन फ्रूट शेती प्रयोगाचे धाडस केले.
ज्यात हैदराबाद येथून रोपे मागवत त्यातून २०१९ मध्ये दोन एकरांत १२ बाय ७ फूट अंतरावर जंबो रेड ड्रॅगनची लागवड केली. मशागत, रोपे, लागवड असा एकरी पावणेचार लाख रुपये खर्च यासाठी लागला ज्यात बँकेकडून आर्थिक साहाय्य चव्हाण दांपत्य यांनी घेतले. हाती भांडवल मर्यादित असल्याने स्वतः चव्हाण दांपत्य, मुलगा तुषार, विशाल अशा कुटुंबातील सर्वांनी शेतातील कामे केली.
आज गेल्या पाच वर्षांच्या प्रवासात सरला चव्हाण यांनी आपल्या ड्रॅगन फ्रूट शेतीचा चार एकरांत विस्तार केला आहे. ज्यात 'अमेरिकन ब्युटी', 'सी' व सुरुवातीची 'जंबो' अशा तीन वाणांचे ड्रॅगन आहे. तर बागेच्या व्यवस्थापनेत पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी सेंद्रिय टाकाऊ घटकांचे आच्छादन करण्यात येते. उन्हाळ्यात त्याचा चांगला उपयोग होतो. सेंद्रिय खतांसह जीवामृताचा वापर केल्याने माती सुपीकता वाढण्यास मदत झाली असल्याचे देखील सौ. चव्हाण सांगतात.
यासोबतच परिसरातील अनेक शेतकऱ्यांना देखील सरला व जगन्नाथ मार्गदर्शन करत आहे. सोबतच इतर शेतकऱ्यांसाठी त्यांनी 'श्रीराम ड्रॅगन फ्रूट' नावाची रोपवाटिका देखील सुरु केली आहे. विशेष की हि रोप वाटिका शासनमान्यता प्राप्त देखील आहे.
उत्पादन, खर्च व मिळणार नफा
जून महिन्यात फुलोरा आल्यानंतर जुलै अखेरीस उत्पादन मिळण्यास सुरवात होते. ऑगस्ट ते नोव्हेंबर हा उत्पादनाचा काळ राहतो. या काळात सुमारे पाच ते सात तोडे होतात. ज्यात सध्या एकरी १४ ते १५ टन उत्पादन मिळत असून यंदा नाशिक, गुजरात बाजारात तर काहीअंशी जागेवर विक्री केलेल्या फळास ८० ते १५० रुपये असा सरासरी दर मिळाल्याचे सरला चव्हाण सांगतात. एकरी मशागत, खते, मजूर असा ५० हजरांचा खर्च होत असून खर्च वजा जाता १० ते १२ लाखांचा नफा मिळतो.
प्रगतीकडे वाटचाल
ड्रॅगनफ्रूटमधून चव्हाण दांपत्यांनी अल्पावधीत चांगले यश मिळविले आहे. कुटुंबातील सर्वांची शेती कामात मदत होत असल्याने खर्चात बचत करणे शक्य झाले असल्याचेही सौ. चव्हाण सांगतात. एकेकाळी कांदा चाळीत राहिलेले चव्हाण कुटुंब आज त्यांच्या स्वप्नातील 'हरिप्रिया' या दुमजली बंगल्यात वास्तव्यास आहे. विशेष की, ड्रॅगन फ्रूट मधून उभं राहिलेल्या या घरावर त्यांनी ड्रॅगन फ्रूटचे चित्र देखील लावले आहे. यासोबतच आज मोटरसायकल, चारचाकी तसेच वाहतुकीसाठी वाहन, ट्रॅक्टरसह आवश्यक यांत्रिकीकरण देखील चव्हाण कुटुंबाने केले आहे.