अनिल गवई
पारंपरिक शेतीला फाटा देत, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शेतकरी आता पाश्चात्त्य आणि बहुउपयोगी शेतीकडे वळल्याचे दिसून येत आहे. चियासीड, मसाला पिकांसोबतच आता शेतकरी परदेशी फळांचीही शेती करण्याकडे देखील वळाले आहेत.
आधुनिक शेतीप्रयोगाची कास धरत घाटपुरीतील एक युवा शेतकरी देखील या प्रवाहात ड्रॅगनफ्रुटची शेती करत आहे. प्रदीप राजाराम वानखडे यांच्या याच अल्पावधीत भरघोस उत्पन्न देणार्या 'ड्रॅगनफ्रुट' शेतीची आता यशोगाथा झाली आहे.
व्हिएतनाम या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था ड्रॅगनफ्रूट शेतीवर अवलंबून असल्याचे पाहून आपणही अशी शेती करण्याचा संकल्प केला. इंटरनेट, यू-ट्यूबवर काही यशोगाथा पाहून घाटपुरी शिवारातील अडीच एकरावर लागवड केली.
१५ लाखांचे भरघोस उत्पादन
सुरुवातीला धाकधूक असतानाच युवा शेतकरी प्रदीपचे गुलाबी स्वप्नं दुसऱ्यावर्षी पूर्ण झाले. दुसऱ्या वर्षातच लागवड खर्च भरून निघाला. त्यामुळे खामगाव तालुक्यात तो आता ड्रॅगनफुटच्या शेतीसाठी मैलाचा दगड ठरत आहे. त्याची यशोगाथा आता तालुक्यातील युवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे.
जिल्हाधिकारी, कृषी विभागाकडून पाहणी
खामगाव तालुक्यातील युवा शेतकरी प्रदीप राजाराम वानखडे यांनी अडीच एकर शेतात ड्रॅगनफुटची लागवड केली. पहिल्यावर्षी कमी प्रमाणात यश आले. दुसऱ्या वर्षी भरघोस उत्पन्न मिळाल्याने प्रयोग यशस्वी ठरला. या प्रयोगाची जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्यासह कृषी विभागाकडून दखल घेण्यात आली.
ड्रॅगनफ्रूट सेवनाचे असे आहेत फायदे
ड्रॅगनफ्रूटमध्ये नैसर्गिकदृष्ट्या फार कमी फॅट असतात. मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. मोठ्या प्रमाणात असलेले अॅण्टिऑक्सिडंट केस, त्वचा आणि आरोग्यासाठी चांगले असतात. व्हिटॅमिन सी त्वचा आणि डोळ्यांसाठी लाभदायक आहे. साखर कमी असल्याने मधुमेहींसाठीही उपयोगी आहे.
वडिलांचा फुलशेतीचा वारसा चालविताना काही तरी नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशातून ड्रॅगनफुट शेतीकडे वळलो. पहिल्या वर्षी। थोडी निराशा झाली. मात्र, दुसऱ्या वर्षी परिश्रम सार्थकी लागले. कृषी विभागाने दखल घेतली. युवा शेतकरी दररोज भेट देत आहेत. - प्रदीप वानखडे प्रगतिशील शेतकरी, घाटपुरी.