माडग्याळ : तालुक्यातील माडग्याळमध्ये गतवर्षी पावसाचे दर्शनच घडले नाही. तशातच फार्मर कप स्पर्धेत माडग्याळच्या महिला शेतकरी गटात तूरपीक दिले. जून कोरडा, जुलैची सुरूवात ही तशीच झाली. मोठे संकट होते.
परंतु जिगरबाज महिलांनी हार मानली नाही. महिलांनी पहिल्यांदाच तुरीचे मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाद्वारे उत्पादनाचा धाडसी निर्णय घेतला. तो यशस्वी ठरला. विक्रमी तुरीचे उत्पादन घेतले. खोडव्याचे ही पीक काढले. आता तिसऱ्यांदा पीक काढले जाणार आहे.
या महिला गटाला नुकतेच फार्मर कप स्पर्धेत तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला. माडग्याळच्या सरपंच अनिता महादेव माळी यांनी महिलांना एकत्रित करून गटाने शेतीचे महत्व पटवून दिले. दुष्काळी माडग्याळ पट्ट्यात पहिल्यांदाच तुरीचे विक्रमी उत्पादन घेतले.
एकरी १ ते २ क्विंटल उत्पादन घेणाऱ्या आणि केवळ जनावरांना चारण्यासाठी उपयोग होणाऱ्या तुरीचे या महिलांनी नवीन पद्धतीने गटशेती करत प्रत्येकी १४ ते १५ क्विंटलचे उत्पादन घेतले आहे. खरे तर स्पर्धेत तूर पीक गटासाठी मिळाल्यानंतर एक आव्हान होते.
जून कोरडा गेल्यानंतर जुलैच्या अखेरीस योग्य पाण्याचे नियोजन करत पहिल्यांदाच तुरीचे मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाद्वारे उत्पादन घेण्याचे ठरविले. मल्चिंग पेपरद्वारे तूर लागवडीचा हा प्रयोग पहिल्यांदाच होता. पण महिलांनी तो यशस्वी तर केलाच त्याचबरोबर विक्रमी उत्पादनही घेतले. मल्चिंगमुळे कामगारांवर होणारा खर्च कमी आल्याचे महिलांनी सांगितले.
माडग्याळला बहुमान माडग्याळला २०२२ मध्ये झालेल्या स्पर्धेत समता पुरूष शेतकरी गटाने बाजरी पिकात प्रथम क्रमांक मिळाला होता. सरपंच यांचे पती महादेव माळी यांच्या मार्गदर्शनाखाली गटाने स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा महिला गटाला बहुमान मिळाला.
अधिक वाचा: तुमच्या पिकात कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे हे कसे ओळखाल?