Join us

दत्ता जाधव यांचा आगाप द्राक्ष छाटणीचा प्रयोग यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 10:49 AM

जोमानं पिकवलं, निगुतीनं पोसलं आणि दरदेखील वाजवून घेतला. गव्हाण (ता. तासगाव) येथील दत्ता जाधव या निवृत्त सैनिक शेतकऱ्यांची ही यशोगाथा. त्यांनी द्राक्षाची आगाप छाटणी घेतली आणि दिवाळीपूर्वीच बंगळुरूला विकलीदेखील.

जोमानं पिकवलं, निगुतीनं पोसलं आणि दरदेखील वाजवून घेतला. गव्हाण (ता. तासगाव) येथील दत्ता जाधव या निवृत्त सैनिक शेतकऱ्यांची ही यशोगाथा. त्यांनी द्राक्षाची आगाप छाटणी घेतली आणि दिवाळीपूर्वीच बंगळुरूला विकली देखील. विशेष म्हणजे द्राक्ष व्यापाऱ्याला वजनामध्ये किलोभरही सूट दिली नाही.

आपलं नाणं खणखणीत असलं की, व्यापाऱ्यांच्या दादागिरीचा सामना कसा करता येतो याचे उदाहरण म्हणून दत्ता जाधवांच्या द्राक्ष शेतीकडे पाहावे लागेल. जुलैपर्यंत पाऊस नसल्याने बागेच्या छाटण्या लांबणीवर पडल्या होत्या. जाधव यांनी १२ गुंठे शेतीत अनुष्का जातीची द्राक्षे घेतली आहेत. त्यांनी उपलब्ध पाण्याच्या जोरावर जुलैच्या पहिल्याच पंधरवड्यात छाटणीचे धाडस केले. पाऊस झालाच, तर फळाचे नुकसान होऊ शकते हे लक्षात घेऊन संपूर्ण बागेवर आच्छादन घातले.

त्यासाठी दीड लाखाहून अधिक खर्च केला. याचे चांगले फळ मिळाले. ऑक्टोबरअखेर बाग तयार झाली. नोव्हेंबरमध्ये उतरणही सुरू झाली. बंगळुरूच्या व्यापाऱ्याने चार किलोंच्या पेटीसाठी ३८५ रुपये भाव दिला. बागेकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्याचा फायदा झाल्याचे जाधव म्हणाले. आच्छादन घातल्याने पाऊस आणि वटवाघळांपासून बचाव झाला. गेल्या आठवड्यात धुवाधार पाऊस होऊनही द्राक्षे बचावली.

माल एक नंबर, सूट नाही मिळणार- शेतकऱ्याला जितके लुटता येईल, तितके लुटण्याचा प्रयत्न व्यापारी करतात. शेतकऱ्याला माल विकताना पोत्याचेही पैसे आकारतात, त्याच्याकडून घेताना मात्र पोते फुकटच घेतात. शिवाय पोत्याचे अर्धा किलो वजनही वजा करतात. बेदाणा सौद्यावेळी उधळणीमध्येच अर्धा-एक बॉक्स संपून जातो. धान्य घेताना तपासणीच्या नावाखाली अर्धा-एक किलो काढून घेतले जाते. पोत्याला एक-दोन किलो सूटही आकारली जाते. जाधव यांनी अशा प्रवृत्तीला ठोस उत्तर दिले.बंगळुरुच्या व्यापाऱ्याला द्राक्ष देताना सूट अजिबात मिळणार नाही, हे स्पष्ट केले. माल एक नंबर असल्याने प्रत्येक घडाचे पैसे द्यावे लागतील, असेही सांगितले. त्यामुळे पेटीला ३८५ रुपये दर मिळाला.

टॅग्स :द्राक्षेसांगलीशेतकरीशेतीदिवाळी 2023