- रविंद्र शिऊरकर
देशी गोवंश संगोपनातून निर्माण होणाऱ्या शेणावर प्रक्रिया करत त्यापासून धूप, अगरबत्ती निर्माण करत वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्याने व्यवसाय उभारला आहे. आवड, संस्कृती, जिद्द, यातून उभारी घेत नवतारुण्यांना लाजवेल अशी यशाची झेप घेत महिन्याकाठी हजारोंची उलाढाल करणारे दांपत्य म्हणजे सौ. शोभा व बबन उत्तमराव शिंदे.
छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील भिवगाव येथील बबनराव यांना दोन मुले दोघेही उच्चशिक्षित व नोकरी निमित्त बाहेर वसलेले. शिंदे यांना पाच एकर शेती कपाशी, मका, तुर, कांदा आदी पिके ते घेत. घरच्या एका देशी गाईंपासून त्यांना जनावरांची आवड निर्माण झाली. ज्यामुळे परिसरातील दूध काढू देत नाही, जवळ गेलं तर मारतात, गाभ राहत नाही अशा विविध कारणांमुळे कसायाला विकली जाणारी गुरे त्यांनी अधिक पैसे देत घेतली. जनावरांपासून जे शेण मिळतं ते शेतकऱ्यांसाठी खत आहे. दोन वेळेचा चारा सोडून त्यांना काही नको अशा भावनेने ते या जनावरांचे संगोपन करतात.
या गाईंपासून वर्षाकाठी २०-२२ ट्रॉली शेणखत उपलब्ध होतं. बबनराव यांची मुले संदिप व दिपक यांनी या शेणापासून धूप, अगरबत्ती बनवणे सुरू केले. सोशल मिडिया आणि इंटरनेट वर बघत प्रयन्त यशस्वी देखील झाला. त्यानंतर त्यांनी परिसरात काहींना हे धूप मोफत दिले त्यातून इतरांच्या ते पसंतीस आले व मागणी वाढली. परिणामी २०२३ पासून धूप साठी लागणारे विविध मशीन त्यांनी खरेदी केल्या. आता आपल्या मुलांनी सुचवलेल्या या मार्गावर बबनराव, शोभाबाई यशस्वी वाटचाल करत आहे.
....अशी होते विक्री शिंदे दांपत्य राज्यभरातील विविध कृषी, लघुउद्योग, बचत गट, आदींच्या प्रदर्शनात स्टॉल लावून धूप विक्री करतात. तसेच तालुक्यातील अनेक किराणा दुकानात त्यांच्या धुप विक्री साठी उपलब्ध आहे.
धूप निर्मिती व विविध सुगंधीत प्रकार दोन वेगवेगळ्या आकारात धूप निर्मिती होते. त्यात गुलाब, भारतवासी, मोगरा, चंदन, ग्लोरी, फँटासिया, ब्लू बेल, रॉलेक्स, लॅव्हेंडर आदी सुगंधाच्या धूप असतात.
बचत गटाची निर्मिती मागणी व खप वाढल्याने सौ. शोभाबाई यांनी परिसरातील दहा महिलांना सोबत घेऊन जय हनुमान महिला स्वयं सहायता समूह या गटाची निर्मिती केली आहे. याद्वारे मागणीचा विचार करता महिन्यातून एकदा किंवा दोनदा सर्व महिलांना एकत्र करत धूप निर्मिती केली जाते. यामुळे बाहेर जाणारा रोजगार परिसरातील या गटांच्या महिलांमध्ये विभागला गेला आहे.
धूप विक्रीतून मिळणारे उत्पन्न३० ग्रॅम, ५० ग्रॅम, १०० ग्रॅम आधी आकारांच्या विविध आकर्षक पॅकिंग मध्ये या धूप कांड्या विक्री योग्य आहे. पंधरा रुपयांपासून त्यांची विक्री होते. यातून खर्च वजा जाता साधारणता महिन्याला शिंदे दांपत्याना 30 हजार ते 35 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते.
देशी गोवंशांचा गोठाशिंदे यांच्याकडे पाच गावरान गाई, चार बैल तर एक एचएफ गोऱ्हा आहे. यांच्या चाऱ्यासाठी 30 गुंठे क्षेत्रात नेपियर गवताची लागवड करण्यात आली आहे. तसेच मका, ज्वारी, बाजरी, आदी पिकांच्या चाऱ्याचाही वैरणीत वापर केला जातो.