Join us

पिंपरखेडच्या शिक्षित तरुणाने फूलशेतीतून शोधला रोजगार; पॉलीहाऊसमधील जरबेरा देतोय आर्थिक साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 10:01 AM

आष्टी तालुक्यातील धानोरा - सावरगाव रस्त्यावरील पिंपरखेड येथील दादासाहेब गव्हाणे या तरुणाने फूलशेतीतून रोजगाराचा मार्ग शोधला आहे. त्यांच्या शेतातील जरबेराची फुले थेट गुजरातच्या बाजारपेठेत जात आहे.

नितीन कांबळे

एमए बीएडपर्यंत शिक्षण घेऊनही नोकरीच्या मागे न लागता, आष्टी तालुक्यातील धानोरा - सावरगाव रस्त्यावरील पिंपरखेड येथील दादासाहेब गव्हाणे या तरुणाने फूलशेतीतून रोजगाराचा मार्ग शोधला आहे. त्यांच्या शेतातील जरबेराची फुले थेट गुजरातच्या बाजारपेठेत जात असून, यातून त्यांनी आर्थिक उन्नती साधली आहे.

आष्टी तालुक्यातील धानोरा सावरगाव रस्त्यावरील पिंपरखेड येथील दादासाहेब गव्हाणे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी अभियानाच्या माध्यमातून २०२०-२१ मध्ये पॉलीहाऊसची उभारणी करत फूलशेतीचा निर्णय घेतला. यासाठी कृषी विभागाचे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले.

३५ लाख रुपयांची गुंतवणूक करत २० गुंठे क्षेत्रात पुणे येथून १२ हजार ५०० जरबेरा रोपे आणून फुलांची लागवड केली. शेतीसाठी ठिबक सिंचनाची सुविधा उपलब्ध केली.

आर्थिक घडी बसली

दररोज ८ मजुरांच्या माध्यमातून आठवड्यात सात ते आठ हजार फुले गुजरातमधील एक प्रमुख शहर व जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बडोदा येथे पाठवली जातात. यातून महिन्याकाठी ७० हजार रुपये मिळतात, तर वर्षाकाठी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. या प्रकल्पासाठी केलेला खर्च आता निघाला असून, बाराही महिने ही फुले बाजारपेठेत चालतात. यातून नक्कीच आर्थिक घडी चांगली बसली आहे.

मन लावून शेती करा

तरुणांनी नवीन तंत्रज्ञान अवगत झाल्याचा फायदा घेऊन जिद्द, चिकाटी, मेहनत उराशी बाळगली, तर नक्कीच शेतातून मोती पिकल्याशिवाय राहत नाही. नोकरीच्या मागे न लागता मन लावून शेती केली, तर यशस्वी शेती होते. हा माझा अनुभव असल्याचे प्रगतशील शेतकरी दादासाहेब गव्हाणे म्हणाले.

तळेगाव दाभाडे येथे प्रशिक्षण

दादासाहेब गव्हाणे हे पुणे येथील तळेगाव दाभाडे येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. तिथे फूलशेती निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आपल्या शेतात फुलांचे उत्पादन घेण्याचे ठरवले. हे उत्पादन कसे घ्यायचे, पाणी आणि फवारणीचा समतोल कसा राखायचा, यातून आर्थिक उत्पन्न किती होते, काय मेहनत घ्यावी लागणार, याचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांनी घेतले.

व्यवसाय फळाला आला

दोन वर्षांपासून सुरू केलेला व्यवसाय फळाला आला आहे. नोकरी करून इतरांच्या हाताखाली न राहता शेतीत कष्ट करून स्वतः मालक बनल्यावर काय होते, हे दादासाहेब गव्हाणे यांनी दाखवून दिले आहे.

शेडनेट पॉलीहाऊस फायद्याचे

■ हवामान बदलामुळे शेती क्षेत्रात अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

■ अडचणींवर मात करण्यासाठी शेडनेट पॉलीहाऊसच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून आर्थिक घडी बसवणारी शेती केल्यास ती फायद्याची ठरते, असे तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी 'लोकमत'ला सांगितले.

कटफ्लॉवर म्हणून ओळख

■ जरबेरा हे बिनवासाचे, पण बहुवर्षायू फूलझाड असल्यामुळे त्याला सतत फुले येतात.

■ हे फूलझाड 'कटफ्लॉवर' म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील नगर, नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अकोला भागांत याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.

■ बीड जिल्ह्यात बोटावर मोजता येईल एवढ्या प्रमाणात ही फूलशेती होते.

हेही वाचा - White Jamun Success Story बुटक्या जातीचे सफेद जांभूळ शेतकऱ्यांसाठी वरदान

टॅग्स :शेतीफुलंशेतकरीबीडआष्टीमराठवाडाशेती क्षेत्रगुजरात