Join us

Mushroom Farming महिन्याकाठी आठ लाखांची मशरूम शेतीतून उलाढाल; उच्चशिक्षित तरुण उद्योजकाची प्रेरणादायी यशकथा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 10:32 AM

आष्टीच्या मशरूम बीजाला अल्पावधीत देश, विदेशात मागणी

नितीन कांबळे

बीड जिल्ह्यातील आष्टीसारख्या दुष्काळी भागात आपल्या मेहनतीच्या व अनुभवाच्या जोरावर बेलगाव येथील महादेव सूर्यभान पोकळे या उच्चशिक्षित उद्योजकाने मशरूम बियाणाचा यशस्वी प्रयोग केला आहे.

पोकळे यांच्या या मशरूमला देशातच नव्हे तर विदेशातदेखील मोठी मागणी असून, या माध्यमातून महिन्याकाठी आठ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल होत आहे. महादेव पोकळे हे ३२ वर्षांपासून विविध प्रकारचे मशरूमचे बीज तयार करत असून, आष्टी येथे एक वर्षांपासून त्यांनी हा प्रयोग सुरू केला आहे.

महादेव पोकळे हे उच्चशिक्षित असून, त्यांनी मेहनत, जिद्द आणि अनुभवाच्या जोरावर हैदराबाद, बारामती येथे मशरूम कल्चर कंपनीत काम केले. त्यानंतर कालांतराने आळंदी येथे एका मित्राच्या मदतीने दोघात हा व्यवसाय सुरू केला. पण, कोरोना काळात मित्र मयत झाल्याने त्यांनी पुणे सोडले आणि गाव गाठले.

आता गत वर्षापासून आष्टी येथे त्यांनी मशरूम बीज बनविण्याचे काम सुरू केले. महिन्यासाठी पाचशे किलो बीज तयार केले जाते. यासाठी लागणारे कल्चर (विरजण) हे अमेरिका येथून दिल्लीला येते आणि तिथून पुण्यात आणले जाते. नंतर आष्टीत आणले जाते. वीस किलो मशरूम आणल्यानंतर कल्चर तयार करून त्याला एसीमध्ये ठरावीक तापमान देऊन मशरूम तयार केले जाते.

वीस किलो कल्चरचे वीस टन होते. यातून महिन्यासाठी साधारण आठ लाख रुपयांची आर्थिक उलाढालदेखील होते. पोकळे यांच्या या प्रकल्पात १५ महिला व १० पुरुष अशा २५ जणांना रोजगारही मिळत आहे.

...असा मिळतो भाव

मशरूमला ग्रामीण भागात १०० ते ३०० रुपये व देश-विदेशात २० हजारांपासून तीन लाख रुपये किलोपर्यंतचा भाव मिळण्याची शक्यता आहे.

मशरुमला मोठ्या शहरांमध्ये मागणी

ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा, आपल्या गावाची वेगळी ओळख निर्माण व्हावी आणि उलाढाल चांगली राहावी यामुळे आपल्या भागात हा प्रयोग सुरू केला. या प्रयोगाला यश मिळत असल्याचे चित्र सध्या आहे.

येथील मशरूमला कर्नाटकच्या बंगळूरू, मध्य प्रदेशातील इंदूर, आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्रात लातूर व इतर ठिकाणी मागणी असल्याचे महादेव पोकळे यांनी 'लोकमत'ला सांगितले.

हेही वाचा - Banana Success Story पारंपरिक पिकांना फाटा देत लागवड केलेली वरुडची केळी गेली आता इराकला 

टॅग्स :शेतकरीबीडमराठवाडाविदर्भशेतीशेती क्षेत्र