मेहरून नाकाडेरत्नागिरी : पारंपरिक पद्धतीने भात, भाजीपाला पिकाचे उत्पादन घेण्याऐवजी एस. आर. टी. पध्दतीचा वापर करून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यात रत्नागिरी तालुक्यातील काजरघाटी येथील प्रमोद भडकमकर यशस्वी झाले आहेत.
गेली दहा वर्ष ते एस. आर. टी. पध्दतीचा अवलंब करत असल्यामुळे त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे. खरीप हंगामात भात व नागली तर रब्बी हंगामात कुळीथ, पावटा, वरी, चवळीची लागवड करून उत्पादन घेत आहेत.
भात लागवडीसाठी एस. आर. टी. पद्धत अतिशय उपयुक्त असून, या प्रकारात शेतीची मशागत व गादीवाफे करावयाचे अन् या कायमस्वरूपी गादी वाफ्यावर एका मागून एक अशी फेरपालट पिके घेता येतात. त्याप्रमाणे प्रमोद विविध पिके घेत आहेत.
खाडी जवळ असल्यामुळे भरतीबरोबर खारे पाणी शेतात येत असल्यामुळे भडकमकर उन्हाळी पिकांचे उत्पादन घेत नाहीत. एकूण २२ गुंठे क्षेत्रावर प्रमोद यांनी गादीवाफे तयार केले असून त्यावर भाताचे उत्पादन घेत आहेत. ७२० किलो भाताचे उत्पादन घेण्यात यशस्वी झाल्याबद्दल त्यांना नुकतेच कृषी क्षेत्रातील योगदानासाठी गौरवण्यात आले.
ऑक्टोबरमध्ये भात काढणी झाली की, जमिनीत असलेल्या ओलाव्याचा फायदा घेत कुळीथ, पावटा, चवळी, वरी या पिकांची लागवड करीत आहेत. पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी आधुनिक तंत्राचा वापर करत शेती केली तर नक्कीच उत्पादन वाढते, हे प्रमोद यांनी सिध्द केले आहे. ते इलेक्ट्रिशियन म्हणून व्यवसाय करतात. तो सांभाळून शेतीची आवड जपली आहे. वडील, पत्नी, दोन मुलांची त्यांना मदत होते.
सेंद्रिय खत निर्मिती व वापरप्रमोद यांच्याकडे दुभती चार जनावरे आहेत. दूध घरात ठेवून अधिकच्या दुधाची विक्री केली जाते. जनावरांचे शेण, गोमूत्रापासून शेणखत व जीवामृत तयार करून शेतीसाठी वापरतात. सेंद्रिय शेतीवर त्यांचा भर आहे. त्यामुळे बागायतीतील पालापाचोळा, शेण एकत्रित करून खत निर्मिती करतात. सेंद्रिय खताच्या वापरामुळे त्यांच्याकडील पिकाचा दर्जा सर्वोत्तम आहे. शिवाय ग्राहकांकडून भाजीपाला खरेदीसाठी वाढता प्रतिसाद आहे. शेतीच्या आवडीमुळेच प्रमोद आपला व्यवसाय सांभाळून शेती करत आहेत. रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर मर्यादित करत आहेत.
काजू बी विक्रीप्रमोद यांच्या स्वमालकीची २१ काजूची झाडे तर ८० आंब्याची झाडे आहेत. ओला काजूगर तसेच वाळलेली बी ते विक्री करत आहेत. ८० आंबा लागवड असून आंब्याचे उत्पादन मात्र अद्याप सुरू झालेले नाही. परंतु झाडांची वाढ चांगली झाली असून येत्या एक दोन वर्षात उत्पादन सुरू होईल, असे प्रमोद यांनी सांगितले.
माझा पूर्वीपासून इलेक्ट्रिशयन म्हणून व्यवसाय आहे. परंतु मला शेतीची आवड असल्यामुळे मी दहा वर्षापूर्वी शेतीक्षेत्रात पदार्पण केले. मात्र कमी श्रम व अधिक उत्पादनासाठी एस. आर. टी या लागवड पध्दतीचा अवलंब केला. गादीवाफ्यावरील लागवड भात, कुळीथ, नागली, चवळी, वरी, पावटा पिकासाठी उपयुक्त ठरली आहे. २२ गुंठ्यात ७२० किलो उत्पादन घेण्यात यश मिळाले आहे. भात पिकाच्या अधिक उत्पादनाचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. केवळ अधिक उत्पादनच नाही तर पिकाचा दर्जा राखण्यातही यश आले आहे. - प्रमोद भडकमकर, काजरघाटी
अधिक वाचा: Guava या तालुक्यातील ९१ गावांमधील शेतकरी पेरूतून बनतोय 'मालामाल'