सोलापूर जिल्ह्यातील अनुकूल वातावरणामुळे निर्यातक्षम केळीचे होणारे उत्पादन, उसाच्या तुलनेत केळीला मिळणारा चांगला दर यामुळे सोलापूर जिल्ह्यातील बागायती क्षेत्रातील पिकाचा पॅटर्न बदलू लागला असून गेल्या तीन-चार वर्षात केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १६ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली आहे. गेल्या तीन-चार वर्षांत केळीच्या लागवड क्षेत्रामध्ये होणारी झपाट्याने वाढ याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या पिकाचे बदललेले अर्थकारण, दोन वर्षापासून सरासरी पंचवीस रुपयापर्यंत या पिकासाठी किलोला तर एक एकर केळीपासून शेतकऱ्यांना चार ते सहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असल्याने अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ओढा केळी पिकाकडे वाढला आहे.
सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात ११ लाख मॅट्रिक टन केळी उत्पादित होते. याच्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठेत व देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होते. उर्वरित साठ टक्के केळीची आखाती देशात निर्यात केली जाते. निर्यातक्षम केळी उत्पादनामुळे या पिकाच्या माध्यमातून पाच हजार कोटीची उलाढाल होत असून गेल्या वर्षी जिल्ह्यातून १६ हजार कंटेनर निर्यात होऊन २२०० कोटीचे परकीय चलन या व्यवसायातून देशासाठी उपलब्ध झाले आहे.
यावर्षी देशासाठी ३४ हजार कंटेनर निर्यातीचे उद्दिष्ट समोर असून यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा निम्म्या वाटा राहणार आहे. जिल्ह्यामध्ये या पिकाच्या संदर्भातील वाहतूक व्यावसाय, कृषी निविष्ठा व्यावसाय, केळी रोपवाटिका व्यवसायाला पॅकिंग मटेरिअल व्यवसायाला चालना मिळाली असून दहा हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची मुले केळी खरेदी विक्री व्यवसायात उतरली असून त्यांना नवीन व्यवसाय मिळाला आहे. आणखी पायाभूत सुविधा निर्माण झाल्या तर भविष्यात या पिकामध्ये मोठी संधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असून जिल्ह्याचे अर्थकारण बदलण्याची क्षमता या पिकामध्ये निश्चितच आहे.
देशात महाराष्ट्राबरोबरच गुजरात, आंध्र प्रदेश राज्यात केळीचे मोठे उत्पादन होते. परंतु या ठिकाणी या पिकासाठी ठराविक हंगाम आहे. महाराष्ट्रातसुद्धा जळगावमध्ये ठराविक हंगामातच केळीची लागवड केली जाते. मात्र सोलापूर जिल्ह्यातील केळी पिकासाठी नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेले कोरडे वातावरण अनुकूल असलेली नैसर्गिक स्थिती जमिनीची प्रतवारी यामुळे संपूर्ण वर्षभर केळी लागवड होत असलेला देशातील एकमेव जिल्हा असल्याने केळी निर्यातदारांसाठी संपूर्ण वर्षभर याठिकाणी केळी उपलब्ध असते.
अधिक वाचा: वाई तालुक्यातील युवा शेतकऱ्याची कमाल; सहापट उत्पन्न देणाऱ्या पांढऱ्या स्ट्रॉबेरीने केली धमाल
त्यामुळे जिल्ह्यातील करमाळा माढा तालुका हा केळीचे हब म्हणून ओळखला जाऊ लागला असून कंदर टेंभुर्णी परिसरामध्ये देशातील सर्व प्रमुख केळी निर्यात तर कंपन्यांनी आपली कार्यालये या परिसरात उघडली असून हा परिसर देशातील केळी व्यापाराचे हे महत्त्वाचे केंद्र बनला आहे. अनुकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे सर्वात जास्त निर्यात करणारा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख झाली आहे. दिवसेंदिवस आखाती देशांमध्ये वाढती केळीला मागणी यामुळे भविष्यात कृषी क्षेत्रामध्ये फार मोठी संधी या पिकासाठी उपलब्ध आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये निर्यातक्षम केळीसाठी अनुकूल वातावरण असतानाच जिल्ह्यामध्ये या पिकासाठी च्या पायाभूत सुविधाही निर्माण होऊ लागल्या असून कृषी व पणन विभागाने जिल्ह्यातील केळीच्या निर्यात वाढीसाठी सोलापूर जिल्ह्यात क्लस्टर निर्माण करण्याची घोषणा करून याचे कामकाज सुरू झाले आहे. यामध्ये निर्यातक्षम केळीसाठी शास्त्रयुक्त पद्धतीने पॅकिंग करण्यासाठी आधुनिक प्रकारची पॅक हाऊस, प्रिकुलिंग युनिट व कोल्ड स्टोरेज ची निर्मिती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत तीस हजार मेट्रिक टन क्षमतेची कोल्ड स्टोरेज तयार झाले आहेत. अनेक नवीन कोल्ड स्टोरेजची निर्मिती प्रगतिपथावर आहे. निर्यातीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा जिल्ह्यात उपलब्ध होत असल्याने भविष्यात या पिकाखालील क्षेत्रामध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे.
लाल अन् इलायची केळीचेही उत्पादन
• करमाळा तालुक्यात वाशिंबे, उम्रड, मांजरगाव शिवारात वेलची केळीचे ४० एकर क्षेत्र.
• कुगाव, चिखलठाण, वांगी येथे रेड बनाना ३० एकर क्षेत्र, भाव जास्त.
• खायला गोड असल्याने शहरात मॉल मध्ये मागणी.
• याला भाव ही जास्त मिळतो यामुळे शेतकरी याकडे वळाला आहे.
• लाल केळी ही केळी नरम आणि गोड असतात. तसेच या केळींचा आकारही छोटा असतो.
• १०० ग्रॅम लाल केळात ८९ उष्मांक, ७४.९१ ग्रॅम पाणी, ०.३३ ग्राम फॅटस, १.०९ ग्राम प्रथिनं, २२.८४ ग्रॅम कर्बोदके, २६ ग्रॅम फायबर, १२.२३ ग्रॅम साखर.
• कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशिअम ही खनिजं क आणि ब-६ ही जीवनस्त्वं भरपूर प्रमाणात असतात.
लाल केळात फोलेटही २० मायक्रोग्राम असतं. लला केळीचं उत्पादन पूर्व आफ्रिका, आशिया, दक्षिण अमेरिका, संयुक्त्त अरब अमीरात येथे होतं. मात्र लाल केळी आणि इलायची केळी आता करमाळ्यातील उत्पादन आहे. आरोग्यासाठी फायदेही असलेल्या लाल अन इलायची केळी नागरिकांमधून चांगली असल्यामुळे क्षेत्र वाढेल. भविष्यात कर्नाटक आणि तामिळनाडूचे मक्तेदारी मोडत सोलापूर आता महाराष्ट्र अव्वल राहील.
सोलापुरातील केळीला आखाती देशात मोठ्या प्रमाणावर मागणी असली तरी युरोपियन देशांमध्ये केळीचा दर व आखाती देशातील केळीचा दर यामध्ये मोठा फरक असल्याने भविष्यात युरोपची बाजारपेठ केळी उत्पादकांसाठी खुणावत असून ही बाजारपेठ उपलब्ध झाल्यास खेळीला यापेक्षाही चांगला दर मिळणार आहे. युरोपसाठी आवश्यक दर्जाची केळी निर्माण करण्याची क्षमता जिल्ह्यात असल्याने भविष्यात जिल्ह्यासाठी मोठी संधी उपलब्ध असणार आहे. परंतु यासाठी काही पायाभूत सुविधांवर लक्ष देऊन दर्जामध्ये आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. - डॉ. विकास वीर, चेअरमन राजेरावरंभा शेतकरी प्रोड्युसर कं.
नासीर कबीर
लेखक 'सोलापूर लोकमत'चे करमाळा तालुका प्रतिनिधी आहेत.