Join us

टरबूजची परदेश वारी; आर्थिक कमाल घडली भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 3:10 PM

दरवर्षी काटकसर करून टरबूज लागवड केल्यास नक्कीच फायदा होत असल्याचे शेतकरी गजानन रावले सांगतात. त्यांना अवघ्या ८० दिवसांमध्ये ५ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न टरबूज पिकांमधून मिळाले आहे.

अप्पू पटेल

दोन वर्षांपासून टरबुजाची मागणी लक्षात घेऊन हिंगोली जिल्ह्यातील जवळा पांचाळ येथील शेतकऱ्याने टरबुजाची लागवड केली. यानंतर केवळ ८० दिवसांमध्ये सदर शेतकऱ्यास ५ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे दरवर्षी काटकसर करून टरबूज घेण्याचा निर्णय शेतकऱ्याने घेतला आहे.

गत काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमीच राहत आहे. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामामध्ये कोणती पिके घ्यावीत, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतत पडतो आहे. त्यातच पाऊस जरी चांगला झाला तरी अळी व कीड पेरलेल्या पिकांवर पडत आहे. त्यामुळे शेतकरी फवारणी करून त्यांचा नायनाट करण्यात त्रस्त होतो. हे पाहून टरबूज लागवड करण्याचा निर्णय दोन वर्षापासून घेतला आहे. पहिले वर्ष टरबूज लागवड केल्यानंतर हाती काही लागले नाही.

परंतु, त्यानंतर मात्र थोडासा लाभ मिळत आहे. कळमनुरी तालुक्यातील जवळापांचाळ येथील शेतकरी गजानन सुभाषराव रावले यांच्याकडे आठ एकर शेती असून, आतापर्यंत ते या शेतीत कापूस, तूर व इतर पिके घेत होते. परंतु, विविध अडचणींमुळे शेतात काहीच पीकत नाही. उसनवारीही फिटत नाही हे पाहून टरबूज लागवड करणे सुरू केले.

गत डिसेंबर महिन्यात टरबूज लागवड केली. त्यानंतर मार्च महिन्यात टरबूज व्यापाऱ्यामार्फत परदेशात पाठविला असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. केवळ ८० दिवसांमध्ये ५ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्यास मिळाले आहे.

भगवानरावांची मोसंबी जळाली, पण जिद्दीनं डाळिंब पिकवले अन् निर्यातही केले

काटकसरही तितकीच महत्त्वाची आहे

२५ डिसेंबर रोजी दोन एकरांमध्ये टरबूज पिकाची लागवड केली होती. ८० दिवसांच्या कालावधीत ५ लाख ६० हजार रुपयांचा फायदा झाला. तसेच चांगल्या दर्जाचे फळ मिळाले असून एक टरबूज सहा ते आठ किलोंपर्यंत भरले आहे. बारा रुपये प्रति किलो दरही टरबुजाला मिळाला आहे. बदलत्या हवामानाचा व वेळोवेळी खतपाणी औषध फवारणी यांचे व्यवस्थापन व रोगराईचे एकात्मिक नियंत्रण केले. त्यामुळे टरबुजाच्या उत्पन्नात भरघोस फायदा झाला.

गतवर्षी खरीप हंगामामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यानंतर 'येलो मोॉक'चा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली. तसेच हळदीवर करपा, हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला. गव्हावर तांबडा रोग तर हरभरा पिकावर भर व घाटेआळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे अशा संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तर टरबुजाची लागवड केली. - गजानन सुभाषराव रावले, शेतकरी

टॅग्स :फळेपीकहिंगोलीशेतीशेतकरी