रविंद्र शिऊरकर
बदललेले निसर्गाचे चक्र आणि बाजारभावांचा नसलेला ताळमेळ यामुळे अनेक द्राक्ष उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आले आहे. मात्र असं असतांना यातून मार्ग काढत अहमदनगर जिल्ह्यातील युवा शेतकऱ्याने पेरू बागेतून काहीसा तुलनात्मक पर्याय द्राक्षाला निर्माण केला आहे.बेलापूर (खुर्द) तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथील योगेश शहाणे हे कुटुंबाने पारंपरिक सोने चांदीचे व्यावसायिक. शहाणे यांचं जवळपास २० जनांच्या एकत्रित कुटुंब तर घरची १६ एकर शेती. योगेश हे त्यांच्या लहान बंधू सोबत शेती सांभाळतात. ज्यात पारंपरिक उस, द्राक्ष, मका, हरभरा अशी पिके ते घेतात.ब्लॅक सोनाका, सुपर सोनाका, जम्बो आशा द्राक्षांचे अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य निर्यातदार असलेले शहाणे हे आता मात्र वातावरणीय बदल, बाजारभाव यामुळे २०१९ पासून तैवान पिंक पेरू कडे वळाले आहे.
तैवान पिंक पेरू व्यवस्थापनशहाणे यांच्या तीन एकर क्षेत्रात सरासरी २८०० पेरूची झाडे असून त्यांची एप्रिल मध्ये छाटणी केली जाते. त्यानंतर शेणखत, सुष्म अन्नद्रव्ये, दाणेदार खतांचा बेसल डोस देत. पुढे जून मध्ये ताग, ढेंचा अशा हिरवळीच्या खताची लागवड केली जाते. मिलिबग, देवी, फुलकिडे आदींसाठी काही अंशी गरजेनुसार रासायनिक बुरशीनाशक व कीटकनाशकांची फवारणी केली जाते अन्यथा सेंद्रिय अर्कांचा वापर होतो. लिंबू आकाराच्या फळांना पिशवी (फोम) लावले जातात ज्यामुळे मच्छर, माशांचा प्रादुर्भाव होत नाही. तसेच चकाकी टिकून राहत असल्याने फळांची गुणवत्ता सुधारते.
तैवान पिंक पेरूतुन मिळणारे उत्पन्न गेल्या वर्षी २०२३ मध्ये तीन एकर क्षेत्रातून पहिल्या तोड्यात तीस टन पेरु उत्पादन मिळाले. ज्यास ३० रुपये किलो प्रमाणे जागेवर दर मिळाला. व्यवस्थापन, निर्विष्ठा, फळांसाठीचे फोम आदींचा खर्च वजा जाता शहाणे यांना एकरी १ ते १.२ लाख रुपये उत्पन्न मिळाले. देखभाल व खर्चाच्या बघता हे उत्पन्न द्राक्षांच्या तुलनेत चांगले असल्याचे ही शहाणे सांगतात. तसेच आगामी काळात पेरूचा विस्तार वाढविण्याचा देखील त्यांचा मानस आहे.