बाबासाहेब धुमाळ
वैजापूर : दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यातील पेंडेफळ गावात सध्या १३० एकर क्षेत्रात मिरची पीक घेण्यात आले आहे. यामुळे 'मिरची हब' (Chili Hub) म्हणून या गावाची तालुक्यात ओळख निर्माण झाली आहे.
येथील एका शेतकऱ्याने एका एकरात आठ लाख रुपयांचे उत्पन्न काढले असून, यासाठी त्याला साठ हजार रुपये खर्च आला आहे.
गोकुळ आहेर असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उच्चशिक्षित आहेत. त्यांचे शिक्षण एम.ए., बी.पी.एड. झालेले आहे. त्यांनी २०१४ मध्ये रोजगार हमी योजनेतून कृषी विभागांतर्गत गावात पहिल्यांदा चार शेततळे खोदली. त्यानंतर त्यांनी पावसाचे पाणी त्यात साठवण्यास सुरुवात केली.
गाव परिसरात नेहमी कमी पाऊस पडत असल्याने दुष्काळी पट्टा म्हणून हा भाग ओळखला जातो. तरीदेखील आहेर यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून त्यांनी चार एकर क्षेत्रावर मिरचीचे पीक घेतले.
एका एकरात आठ लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिरचीतून होते. त्यासाठी साठ हजार रुपये खर्च येतो. एका एकरात ३०० क्विंटल मिरची उत्पादन होत असून, मिरचीला प्रति क्विंटल ८ हजार रुपयांचा दर मिळतो.
हे पीक सहा महिन्यांचे असून, छत्रपती संभाजीनगरसह सिल्लोड, पुणे, नाशिक, मुंबई येथील बाजारात मिरचीची विक्री केली जाते.
आहेर यांना मिरची पिकातून भरपूर पैसे मिळत असल्याने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून गावातील अनेक शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड करण्यास सुरुवात केली. सध्या या गावात १३० एकर क्षेत्रात मिरची पिकाचे उत्पादन शेतकरी घेत आहेत.
यामुळे 'मिरची हब' म्हणून या गावाची तालुक्यात ओळख निर्माण झाली आहे. येत्या मे, जूनमध्ये या गावात ४०० एकर क्षेत्रात मिरचीचे पीक शेतकरी घेणार असल्याची माहिती आहेर यांनी दिली.
दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैजापूर (Vaijapur) तालुक्यातील पेंडेफळ (Pendephal) येथील गोकुळ आहेर यांनी लागवड केलेले मिरचीचे पीक असे बहरले आहे. त्यांनी चार एकरांत हे पीक घेतले आहे. ६० हजार रुपये एका एकरात मिरचीसाठी खर्च होतो.
१३० एकर क्षेत्रात पेंडेफळ येथील शेतकरी मिरची पिकाचे उत्पादन घेत आहेत. यामुळे 'मिरची हब' म्हणून या गावाची तालुक्यात ओळख निर्माण झाली आहे.
अशी केली जाते तयारी
* पावसाळ्यात शेततळ्यात पाणी साठवून त्याद्वारे मिरची लागवड केली जाते. प्रथम हिवाळ्यात शेतीची नांगरट करून रोटावेटरने ढेकळे फोडून त्यावर बेड तयार करण्यात येतात.
* बेडवर शेणखत आणि रासायनिक खताचा डोस टाकून बेड तयार केला जातो. त्यानंतर बेडवर लॅटरल ठिबकच्या नळ्या अंथरून मल्चिंग पेपर अंथरला जातो.
माझ्याकडे २२ एकर शेती आहे. त्यातील चार एकरांत मिरचीचे उत्पादन घेतले आहे. एका एकरात आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिरचीतून मिळत असून, त्यासाठी साठ हजार रुपये खर्च येतो. एका एकरात ३०० क्विंटल मिरची उत्पादन होते. मिरचीला बाजारात प्रतिक्विंटल ८ हजारांचा दर मिळतो. - गोकुळ आहेर, मिरची उत्पादक, पेंडेफळ