गजानन हगवणे
काटेवाडी परिसर ऊस व द्राक्ष पिकासाठी ओळखला जातो मात्र युवा शेतकरी अनिल जाधव उसाच्या का पट्यात थायलंड च्या रेड डायमंड या पेरू वाणाची लागवड करून शाश्वत उत्पादनाची किमया साधली आहे.
सरासरी एकरी तीन ते चार लाखा पर्यंत उत्पादन खर्च येतो, यातून वार्षिक उत्पन्न साधारण सहा ते सात लाख रुपयांपर्यंत मिळत आहे. काटेवाडी परिसर द्राक्ष या प्रमुख फळ पिकासाठी ओळखला जातो. मात्र, सध्या अवकाळीचा फटका व अस्थिर बाजार यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत येतो.
यामुळे पाच वर्षापूर्वी अनिल जाधव यांनी थायलंडच्या रेड डायमंड या पेरूच्या वाणाची रोपे आणली होती, या पिकाचा त्यांनी सखोल अभ्यास करून सुरुवातीला एक एकरावर केलेली लागवड केली. यामध्ये यश मिळाल्यावर आता साडे चार एकरांपर्यंत पेरूची लागवड केली आहे.
सध्या चांगले उत्पादन मिळत असल्याने जाधव यांची फळबाग परिसरात आदर्शवत ठरली आहे. एका एकरात साधारण ४०० रोपे बसतात, पहिल्या वर्षी साधारण पाच टनापर्यंत उत्पादन मिळाले आहे. रेड डायमंड पेरूला स्थानिक बाजारात प्रतवारीनुसार ६० ते ७० रुपये प्रतिकिलो एवढा बाजारभाव तर दिल्लीतील बाजारात या फळाला सध्या ९० ते१०० रुपये प्रतिकिलो मिळत आहे.
परिपक्व झालेली एक बाग एकरी १५ ते २० टनापर्यंत प्रतिबहरात उत्पादन देते, वर्षातून दोन पिके या फळबागेमध्ये घेता येतात. पाण्याचा निचरा होणारी कोणतीही जमीन या पेरू लागवडीसाठी उपयुक्त ठरते पेरू फळाच्या उत्पादन बरोबरच जाधव यांनी बागेतील पेरुच्या झाडावरच भेट कलम तयार करून दर्जेदार रोपे तयार केली आहेत.
कमी रोगराई, खात्रीशीर उत्पादन, बाजारात मिळणारा चांगला दर, आठ ते दहा दिवसाचा असणारा किपिंग पिरेड यामुळे अनेक शेतकऱ्यांकडून जाधव यांच्याकडे रेड डायमंड पेरूच्या रोपांची मागणी वाढू लागली आहे. या माध्यमातून जाधव यांनी देखील आपल्याच शेतात रेड डायमंड पेरूच्या रोपांची नर्सरी देखील सुरू केली.
यामुळे आर्थिक फायदा झाला आहे जाधव यांच्या या यशस्वी प्रयोगानंतर कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र बारामती, जिल्हा परिषदेचा शेतकी विभाग, तसेच कृषी तज्ज्ञ व अधिकाऱ्यांनी देखील या फळबागेला भेटी देऊन कौतुक केले आहे.
पेरूची वैशिष्ट्ये
• फळाचा गर लाल रंगाचा असतो, फळाचा रंग हिरवट पोपटी असतो.
• बियांचे प्रमाण कमी असते, फळांमध्ये शर्कराचे प्रमाण कमी असल्याने डायबिटीस असणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त.
• किपिंग पिरेड असल्याने फळे आठ ते दहा दिवस ताजी राहतात.
रेड डायमंड पेरूला बाजारामध्ये मोठी मागणी आहे नेहमीच्या पेरु पेक्षा या पेरूची चव वेगळी आहे. यशस्वी उत्पादन घेतल्यानंतर या पेरूच्या रोपांची मागणी माझ्याकडे होऊ लागली, त्यामुळे मी माझ्या शेतात रेड डायमंड पेरूची नर्सरी सुरु केली. बाहेरच्या जिल्ह्यातून देखील शेतकरी या ठिकाणी रेड डायमंडचे क्षेत्र पाहण्यास येत आहेत. कर्नाटकमधून देखील या रोपांना आता मागणी येऊ लागली आहे. - अनिल जाधव, पेरू उत्पादक शेतकरी, काटेवाडी
अधिक वाचा: दुष्काळावर करुनीया मात शेटफळेचा रुपेश झाला डाळिंब शेतीतील सम्राट