शेलपिंपळगाव : कष्टाला अनुभवाची साथ दिल्यास कमी शेती क्षेत्रातदेखील जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न घेता येऊ शकते, असा यशस्वी प्रयोग फळ उत्पादक शेतकऱ्याने करून दाखविला आहे. पऱ्हाडवाडी (ता. शिरूर) येथील बापूदादा आनंदराव पऱ्हाड यांनी दीड एकर क्षेत्रात कलिंगड, तर आंतरपीक म्हणून मिरची पिकाची लागवड केली आहे.
सद्यस्थितीत कलिंगड पीक काढणीयोग्य झाले असून, मिरचीला फुले लागली आहेत. या दोन्हीही पिकाच्या उत्पादनातून लाखोंचे उत्पन्न त्यांना प्राप्त होणार आहे. विशेषतः बापूदादा व त्यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्या अलका पऱ्हाड यांनी शेतीत केलेला आमूलाग्र बदल पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी गर्दी करत आहेत.
साधारण दोन महिन्यांपूर्वी बापूदादा पऱ्हाड यांनी दीड एकर क्षेत्रात 'बेड' पद्धतीत कलिंगड पिकाची व आंतरपीक म्हणून मिरची पिकाची लागवड केली. बेडवर मल्चिंग पेपर टाकून ठिबकद्वारे पिकाला पाण्याचे नियोजन केले. योग्य पाणी व खतांचा मात्रा दिल्याने लागवडयुक्त रोपांची वाढ व्यवस्थित होऊन झाडे यशस्वी मार्गक्रमण करू लागली.
ड्रीपद्वारे आवश्यक औषधांचा मात्रा देत राहिल्याने पिकाची रोगराईपासून मुक्ती होण्यास अधिक मदत झाली आहे. सध्या कलिंगडाची फळबाग फळांनी बहरली असून, साठ दिवसांनंतर फळे काढण्यास तयार झाली आहेत. प्रत्येक वेलीस तीन ते चार फळे आली आहेत. सरासरी एका फळाचे वजन चार ते पाच किलोपर्यंत झाले आहे.
सध्या उन्हाचा तडाखा जास्त असल्याने कलिंगड पिकाला बाजारात चांगली मागणी आहे. त्यामुळे प्रतीनुसार फळांना थेट शेतातच ११०० ते १२०० रुपये प्रतिदहा किलो असा भाव मिळत असल्याने पीक उत्पादनासाठी केलेल्या कष्टाचे चीज होत आहे.
दोन महिन्यात दीड एकर क्षेत्रात साधारणतः ३५ ते ४० टन कलिंगड उत्पादन पिकाचे अपेक्षित असून, त्यामाध्यमातून चार लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होणार असल्याचे बापूदादा पऱ्हाड यांनी सांगितले, शेतीत केलेला आमूलाग्र पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी गर्दी करत आहेत.
शेतीत विविध पिकांचे प्रयोग करतो. यंदा कांदा पिकाच्याही सुमारे एक हजारांहून अधिक पिशव्या उत्पादित केल्या आहेत. ऊसतोडणीनंतर त्याच क्षेत्रात ठिबक सिंचन करून कलिंगड व मिरचीची लागवड केली. प्रतिकूल हवामानामुळे आता उसाचे उत्पादन घटत चालले आहे. त्यामुळे पर्यायी पिकांचे प्रयोग केले तरच शेती फायदेशीर होऊ शकते. - बापूदादा पऱ्हाड, फळ उत्पादक शेतकरी
अधिक वाचा: बिरोबावाडीच्या रासकरांच्या भगव्या डाळिंबाची नेपाळ, बांगलादेशात हवा