Join us

एका शेततळ्याने साधली किमया! ९६ एकर जमिनीला ठरले वरदान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2023 6:06 PM

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने तयार केलेल्या ८० लाख लिटर क्षमतेच्या शेततळ्या मुळे देवस्थानच्या मालकीची ९६ एकर मुरमाड, माळरान व डोंगर उतारावरील जमीन ओलिताखाली आली आहे.

- संजय देशमुख

रांजणगाव : रांजणगाव गणपती येथील श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने तयार केलेल्या ८० लाख लिटर क्षमतेच्या शेततळ्या मुळे देवस्थानच्या मालकीची ९६ एकर मुरमाड, माळरान व डोंगर उतारावरील जमीन ओलिताखाली आली आहे. शेततळ्यातील पाण्याच्या वापराने देवस्थानच्या प्रक्षेत्रावर नंदनवन फुलले असून परिसर सुजलाम् सुफलाम् होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सुमारे पाच लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले ८० लाख लिटर पाणी साठवण क्षमता असलेले शेततळे देवस्थानच्या ९६ एकर जमिनीला वरदान ठरत आहे. देवस्थानची जुनी ऐतिहासिक विहीर व आता नव्याने घेतलेल्या विहिरींचे पाणी नैसर्गिक उंचावर तयार करण्यात आलेल्या शेततळ्यात साठवून त्याचा वापर करून प्रक्षेत्रावर लागवड केलेल्या फळझाडे, फुलझाडे, ऊस, ज्वारी, गहू आदि पिके घेण्यात आली आहेत.

उजाड माळरानावर बागायती पिके

देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, मुख्य विश्वस्त ओमकार देव, उपाध्यक्ष संदिप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव व रांजणगाव गणपती ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली व देवस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने उजाड माळरानावर हिरवेगार बागायती पिके घेण्याची किमया साधली आहे. सध्या प्रक्षेत्रावरील पिकांना ८० लाख लिटर पाणी क्षमता असलेल्या शेततळ्यातून पाणी पुरवठा केला जात असून केशर आंबा ८०, नारळ ६०, चिकू १०, पेरु १०, चिंच २० या फळझाडांची लागवड केलेली असून त्यातील काही फळझाडांचे उत्पन्न सुरू झाले आहे. तर जास्वंद, गुलाब, मोगरा, सोनचाफा सारखी फुलझाडे मोठ्या प्रमाणात फुलत आहेत. ५ एकर क्षेत्रावर गहू, तर ५ एकर क्षेत्रावर ज्वारी पिके उभी आहेत.

गणेश भक्तांनी आतापर्यंत देवस्थानला दान केलेल्या १५ देशी गायी व ४ वासरांसाठी मुक्तगोठा संकल्पना राबविली असून भक्कम शेड बांधण्यात आले आहे. शेतातून निघालेले उत्पन्न अन्नछत्रात दैनंदिन महाप्रसादासाठी वापरले जात असल्याचे मुख्य विश्वस्त ओमकार देव व सचिव तुषार पाचुंदकर यांनी सांगितले.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीगणपती