लासलगाव : केळीपीक म्हटलं की जळगाव जिल्ह्याचे नाव समोर येत. जळगाव जिल्ह्यात मोठया प्रमाणावर केळीचे उत्पादन घेतले जाते. मात्र आता कांद्याची पंढरी म्ह्णून ओळख असलेल्या लासलगावमध्येही केळीचा तोरा पाहायला मिळत आहे. लासलगाव जवळील पाचोरे खुर्द येथील शेतकऱ्याने पाच एकर शेतात केळीची शेती केली. ही केळी अरब देशात निर्यात होत असल्याने चांगला बाजार भाव मिळतो यातून २७ ते २८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे शेतकरी तानाजी आंधळे सांगतात.
केंद्र सरकार कांदा धोरणाबाबत वारंवार बदल केल्यामुळे कांद्याच्या दरात चढउतार होत असल्यामुळे कांद्याची शेती तोट्यात आली. यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या समस्यांमुळे चिंताग्रस्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शेतीत वेगळा प्रयोग करावा, अशी कल्पना मांडली. लासलगाव जवळील पाचोरे खुर्द येथील कांदा उत्पादक शेतकरी तानाजी आंधळे यांनी क्षणाचा ही विलंब न करता जळगाव येथे जात जैन इरिगेशनचे टिश्यू पेपर कल्चर ग्रँड नाईन या जातीच्या केळीचे रोपे आणून २६ डिसेंबर २०२२ रोजी लागवड केली.
केळीचे उत्पादन येण्यासाठी अकरा ते बारा महिन्यांचा कालावधी लागत असल्याने यादरम्यान कांद्याचे अंतर्गत पीक घेतले होते. त्या कांद्याला उत्पादन खर्चही निघणार नाही, असा पाचशे ते सहाशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. केळीच्या एका झाडावर सरासरी ३७ ते ३८ किलोचे केळीचे घड निघत आहेत. पहिल्या खुड्यात २६ टन केळी निघाली दुसऱ्या खुडा चालू आहे यात ५० ते ५५ टन केळी निघणार आहेत. या पाच एकर केळीच्या शेतात सुमारे १५० टन केळीचे उत्पादन निघण्याची अपेक्षा आहे. ही सर्व केळी अरब देशात निर्यात केली जात आहेत. चांगला बाजार भाव आणि उत्पादन चांगले मिळत असल्याने कांद्याने मारले... पण केळीने तारले असे म्हणत शेतकऱ्यांनी काम सुरू केले आहे.
कांदा उत्पादक शेतकरी संकटात
शेतकरी तानाजी आंधळे म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून कांदा उत्पादन घेत आहे. मात्र शासनाने धोरणामुळे कांद्याला भाव नाही. अनेक वेळा साठवूनही योग्य दर मिळत नाही. वारंवार खर्च वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र उत्पन्न कुठेतरी निघतही नाही. अशा स्थितीच केळीचे उत्पादन घेण्याचे ठरविले. योग्य नियोजन, मेहनतीच्या जोरावर चांगले उत्पादन निघत असून चांगला फायदाही झाल्याचे आंधळे यांनी सांगितले.