बेल्हा : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बेल्हा (ता. जुन्नर) येथील गणपत औटी यांनी आपल्या ३० गुंठे निर्माण केलेल्या जंगलात चक्क साडेपाच फूट लांबीचा दुधीभोपळा पिकवलाय.
या भोपळ्याची चर्चा तालुक्यात होत असून, अनेक जण हा भोपळा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. बेल्हा येथील गणपत औटी यांनी ३० गुंठे शेतात योग्य नियोजन करून अप्रतिम १५० ते २०० प्रकारच्या वनौषधीने शेती फुलवली आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांनी औषधी वनस्पती गोळा केल्या आहेत. संपूर्ण सेंद्रीय शेती केली असून, येथे झाडांचे कलम करून विविध प्रयोग केले जातात. त्यात त्यांनी दुधी भोपळ्याची लागवड केली होती.
त्या भोपळ्याला साडेपाच फूट लांबीचे भोपळे येत आहेत. या शेतकऱ्याने शेतात केलेले प्रयोग अफाट असून, त्यातील वेगवेगळ्या उत्पन्नावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांनी आपली शेती ही कुठल्याही कृषी पर्यटनाला मागे टाकेल एवढी देखणीच नव्हे, तर उत्पादकही केली आहे.
एक किलो पेक्षा मोठी फळ देणारा आंबा व नारळाचे झाड यांच्या बागेत आहेत. चार गुंठ्यांच्या दोन-चार वाफ्यातील झाडांतून वांगी कुठलंही कीटकनाशक न वापरता दीड टन उत्पादन काढतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मलबेरी हे उत्पादन, तर शेतीचे सार अर्थशास्र बदलून टाकणार आहे. संशोधनात कर्करोगावर गुणकारी ठरणाऱ्या अंबाडीच वाण त्यांनी विकसित केले आहे.
एकेका झाडाला हजार भर बोंडे आणत त्यांनी उत्पादनाचे विक्रम मोडले आहेत, त्यांच्या मळ्यात भरपूर तुतीची लागवड आणि त्याखाली जमिनीत लावलेली वेगवेगळ्या प्रकारची कंदमुळे ती जसजशी तयार होऊ लागतात, तसतशी ती जमिनीच्यावर येऊ लागतात.
उत्कृष्ट व्यवस्थापन- मळ्यामध्ये शेवगा, पपई, रामफळ, कढीपत्ता, लिंबू, आंबा, पेरू, नारळ, केळी, टोमॅटो, शेंगाचे वेल, ऊस, ड्रॅगन फ्रूट असे अनेक फळे आणि फळभाज्या आहेत.- औटी त्यांचा मुलगा व पत्नी या तिघांनी ही शेती फुलवली आहे.- २० वर्षापूर्वी जमीन पाण्याच्या नियोजनासाठी चढउतार बघून विकसित केली.- बोरवेलचे पाणी पाटांमधून मळाभर सोडलेले.- सर्व झाडे, पालापाचोळा आणि कचऱ्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन केले.