बापू नवले
दौंड तालुक्यातील वाखारी गावाच्या दक्षिण भागाला अपुऱ्या पाण्यामुळे उन्हाळ्याचा चांगला चटका सोसावा लागतो. येथील उच्च शिक्षित जीवन माणिक शेळके यांच्या शेतीमधे विविध नाविन्यपूर्ण प्रयोग चालू असतात.
त्यांनी मधुकामिनी नावाचे शो मार्केट मधील पीक घेऊन एक आदर्श उत्पादक शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली आहे आणि यशाचे शिखर गाठले. पारंपारिक पिकांसाठी अत्यल्प मजूर, अपुरे पाणी, औषध खतांचा वाढता वापर या सगळ्या गोष्टीवर मात करीत त्यांनी मधुकामिनी या पिकाची निवड केली आणि दीर्घ कालावधीसाठी उत्पन्नाचा शाश्वत स्रोत निर्माण केला आहे.
जीवन शेळके हे बीएसस्सी केमिस्ट्री मधून पूर्ण शिक्षण घेतलेले उच्चशिक्षित युवक आहेत. वडिलोपार्जित शेतीमध्ये त्यांनी आतापर्यंत पॉलिहाऊस मध्ये कलर कॅप्सिकम लाल व पिवळ्या रंगांमध्ये, गुलाब, जर्बेरा, जिप्सोफीला यासारखे वैविध्यपूर्ण पिकांची निवड करून यशस्वीपणे बाजारभाव मिळवला.
८ वर्षांपूर्वी त्यांचे स्नेही सुपा बारामती येथील हनुमंत बबन कुतवळ यांच्या मार्गदर्शनाने मधुकामिनी या पिकाची गरज आणि भौगोलिक दृष्ट्या आपल्या शेतीमध्ये सहज उपलब्ध होऊ शकते म्हणून मधुकामिनीची निवड केली.
गेल्या ८ वर्षापासून त्यांनी या पिकातून लाखो रुपयांची कमाई केली. एक वेळ लागवड केल्यानंतर त्याची वर्षातून चार वेळा कटिंग करावी लागते. कृषी विभागाचे कृषी सेवक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने सिंचन पद्धतीमध्ये वेळोवेळी शेळके यांनी बदल केले.
ठिबक सिंचन द्वारे पाणी देऊन पीक ताजे तवाने ठेवता येऊ लागले, या पिकाला २० वर्षांचे आयुष्य असते. सरासरी एकरी वर्षात ४ लाखाचे उत्पन्न सहज मिळते असे जीवन शेळके यांनी सांगितले.
मधुकामिनी
• पुणे-मुंबई याच बरोबर भारतातील मोठमोठ्या शहरांमध्ये मधुकामिनीच्या गड्डी पाठवण्यात शेळके यशस्वी झाले आहेत.
• गोवा, हैदराबाद, दिल्ली या ठिकाणी त्यांनी वेळोवेळी २० काडी गड्डी (बंच) पॅकिंग करून पाठवले आहेत.
• लग्नसराईत सारख्या हंगामामध्ये एका गड्डीस २० रुपये इतका उच्चांकी दर मिळतो.
• किमान ५ रुपये तरी दर निश्चित मिळतोच मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर पीक आहे.
• या पिकाला एकदा लागवड केल्यानंतर सुमारे २० वर्षांपर्यंतचे आयुष्य असते. कमीत कमी मजूर वर्ग या पिकासाठी लागतो.
• औषध व खतांचा अत्यल्प खर्च असेल तरीही उत्कृष्ट उत्पन्न मिळते. पाण्याची उपलब्धता कमी असेल त्या ठिकाणीही उत्पन्नावर परिणाम होताना दिसून येत नाही.
• सर्वात महत्त्वाचे कीड विरहित व रोग विरहित पीक असल्याने औषध उपचार नसल्याबरोबरच असतो.
• या पिकाचे संगोपन करण्यासाठी जीवन शेळके यांचे वडील माणिक तुकाराम शेळके व आई उमा माणिक शेळके, पत्नी प्रियांका यांची मोलाची साथ लाभते.
• दर्जेदार व नाविन्यपूर्ण पिके घेत शेळके यांच्याकडून शेती क्षेत्रातील नवं शेतकरी युवकांपुढे आदर्श मांडला गेला आहे.
लागवड पद्धत
• सर्वसाधारणपणे पावसाळ्यात जून महिन्यामध्ये या झाडाची लागवड केली जाते. त्याची रोपे मिळतात, रोपे तयार शेळके यांच्या नर्सरीमध्ये देखील होतात. ते लागवड व संगोपन याबाबत मार्गदर्शन करतात.
• ४x४ अंतरावर सपाट बेडवर याची लागवड केली जाते. मुळ्या कुठपर्यंत जातात यावर पाणी द्यावे लागते एक महिन्यानंतर त्याला डीपद्वारे पाणी देऊ शकतो.
• लागवड करताना सुरवातीला शेणखताचा एक डोस देणे आवश्यक असते. एक महिन्यानंतर सर्वसाधारणपणे बांधणीच्या ट्रॅक्टरने त्याची बांधणी करून घ्यावी लागते.
मधुकामिनीचे मार्केट
• मेट्रो सिटी मध्ये प्रत्येक इव्हेंट मॅनेज करताना जास्तीत जास्त मधूकामिनीचे बंच वापरले जातात.
• लग्न त्यासारखे घरगुती सर्वच कार्यक्रमांमध्ये या बंचचा वापर करून सुशोभीकरण केले जाते.
• प्रामुख्याने चुके मध्ये जास्तीत जास्त वापर केल्यामुळे वर्षभर मागणी समप्रमाणात राहते.
• पुणे- मुंबई या शहरांमध्ये मधुकामिनीचा वापर जास्तीत जास्त डेकोरेशन साठी केला जातो.
अधिक वाचा: ऊस शेतीला दिली आधुनिकतेची जोड; एकरी १०८ टन झाली विक्रमी ऊस तोड