दत्ता पाटील/अनिल पाटीलम्हाकवे: कांदा उत्पादनात आघाडी घेतलेल्या सौंदलगा (ता. निपाणी) येथील निवृत्ती दादू पाटील यांनी एका एकरात कांद्याचे आठ टनांहून अधिक उत्पन्न घेतले आहे.
यंदा थंडीचे प्रमाण कमी असल्याने याचा कांदा उत्पन्नाला फटका बसला आहे. कांद्याला ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. एकरातून कांद्याचे तीन लाखांपर्यंत उत्पन्न मिळाले तर पावसाळी हंगामात घेतलेले सोयाबीनचे ११ क्विंटल उत्पादन मिळाले.
सध्या यामध्ये असणारा ऊस कमीत कमी ६० ते ६५ टन होणार आहे. त्यामुळे वर्षभरात खर्च वजा जाता दोन्ही पिकातून चार लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.
पाटील हे व्यावसायिक पद्धतीने शेती करतात. केवळ उत्पन्नच न घेता शेतामध्ये शेणखतासह रासायनिक खते, कीटकनाशके, चांगल्या प्रतीची बी-बियाणे वापरण्यावर त्यांचा भर असतो.
कांदा हे उसात दुय्यम पीक म्हणूनच करतात. गतवर्षी एकरी १२ ते १३ टनापर्यंत उत्पादन मिळाले. यंदा थंडी कमी असल्याने कांद्यावर करपा, सुरळी मर व माता याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला.
परिणामी, पिकाला अधिक वेळ देऊन जपावे लागले. तरीही उसात आंतरपिक म्हणून कांदा चांगला असल्याचे पाटील सांगतात.
सरीच्या दोन्ही बाजूला कांदा लावण- पाटील हे पावसाळी हंगामातील सोयाबीन घेऊन ऑक्टोबरमध्ये सरीच्या दोन्ही बाजूला कांदा लावण करतात, तर महिन्यानंतर सरीमध्ये उसाची लावण करतात.- कांदा लावताना पाटील हे अंतर कमी ठेवतात. त्यामुळे कांदा जास्त मोठा होत नाही. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. त्यांना सुरेश सनदी, चैतन्य कवाणे यांचे मार्गदर्शन लाभले.
नोकरीपेक्षाशेतीच भारीपाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी अत्यंत कष्टप्रद जीवन जगत आणि दुसऱ्याची जमीन कसायला घेऊन सहा एकरांहून अधिक जमीन खरेदी केली आहे. तसेच, दीड किलोमीटर अंतरावरून वेदगंगा नदीतून पाणी योजनाही केली आहे. १७ वर्षापूर्वी एका साखर कारखान्यातून नोकरीतून कमी केल्यानंतर निराश न होता पाटील यांनी केलेली प्रगती निश्चितच युवकांना प्रेरणादायी आहे.
निसर्गाच्या लहरीवर शेती अवलंबून आहे, हे निश्चित असले तरी पूर्णतः नकारात्मक आणि निराश न होता नोकरी किंवा अन्य व्यवसायाप्रमाणे झोकून देऊन काम केल्यास शेतीही चांगले अर्थबळ देऊ शकते. यासाठी राबण्याची तयारी ठेवली पाहिजे. - निवृत्ती पाटील, शेतकरी, सौंदलगा
अधिक वाचा: आयटीपेक्षा शेतीच देतेय जास्त पॅकेज; कोठारे बंधूंची टरबूज, द्राक्षातून लाखोंची कमाई