Join us

सांगोला येथील शेतकरी राहुल वाले यांच्या बाजरीला आले ४ फुटांपर्यंत कणीस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 9:41 AM

कोळा (ता. सांगोला) येथील राहुल वाले या शेतकऱ्याने अवघ्या २० गुंठ्यांत पेरलेल्या बाजरीला तब्बल ४ ते ५ फुटांपर्यंत लांबीचे कणीस लागल्याने, सांगोला तालुक्यात बाजरीचं कणीस चर्चेचा विषय ठरला आहे.

अरुण लिगाडेसांगोला : आजचा शेतकरीशेती व्यवसायात नवनवीन प्रयोग करून डाळिंब, पेरू, आंबा, सीताफळ उत्पादनाबरोबर शेती पिकातही भरारी घेताना दिसत आहेत, अशाच शेतकऱ्यांपैकी कोळा (ता. सांगोला) येथील राहुल वाले या शेतकऱ्याने अवघ्या २० गुंठ्यांत पेरलेल्या बाजरीला तब्बल ४ ते ५ फुटांपर्यंत लांबीचे कणीस लागल्याने, सांगोला तालुक्यात बाजरीचं कणीस चर्चेचा विषय ठरला आहे. बाजरीचे शिवार पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी वाले यांच्या शेतात गर्दी केली आहे.

आजचा शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतीत वेगवेगळे प्रयोग करून फळ पिके, शेती पिके, भाजीपाल्यात विक्रमी उत्पादन घेताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकरी पारंपरिक पिकांकडे पाठ फिरवून नगदी पिकाकडे वळला असताना, आता पारंपरिक पिकातही नवनवीन प्रयोग होऊ लागले आहेत. याचे उत्तम उदाहरण राहुल वाले आहेत. बाजरी तसे पारंपरिक पीक सर्वांनीच अनुभवले, पण आजवर आपण साधारण फूटभर लांबीपेक्षा कमी लांबीचे कणीस पाहिले असेल. मात्र, सांगोला तालुक्यातील कोळा येथील शेतकरी राहुल वाले यांनी लावलेल्या बाजरीला ४ ते ५ फुटांपर्यंत कणीस लागल्याचे आश्चर्य वाटायला नको. त्यासाठी नियमित करण्यात येणाऱ्या बाजरी पिकापेक्षा तिपटीने जास्त उत्पादन बाजरी पीक देते, असा दावाही वाले यांनी केला. विशेष म्हणजे, त्यासाठी मोजकीच खते वापरल्याचे त्यांनी सांगितले.

राजस्थानाहून मागविली तुर्की वाणवाले यांनी राजस्थानवरून पोस्टाने १ हजार रुपये किलो दराने तुर्की वाणाचे बाजरीचे गावठी बियाणे आणून त्याची आपल्या शेतात २० गुंठ्यात अर्धा किलो बियाणे पेरणी केली होते. यंदा पर्जन्यमान चांगले झाल्याने पीक चांगले जोमात आले, बहरलेल्या बाजरीला तब्बल ३ ते ४ फुटांपर्यंत कणीस लागल्याने तमाम शेतकरी वर्गातून वाले यांच्या बाजरीचे शिवार चर्चेचा विषय ठरला आहे.

आपल्या भागातील बाजरी व तुर्की जात असलेल्या बाजरीमध्ये फरक असून, तुर्की जात असलेल्या बाजरीमध्ये उष्णता कमी प्रमाणात असल्यामुळे ही बाजरी मूळव्याध व शुगर असलेले नागरिक खाऊ शकतात. - राहुल वाले, शेतकरी

टॅग्स :बाजरीशेतकरीशेतीराजस्थानपीक