पुण्यातील चांदखेड येथील नितीन गायकवाड या शेतकऱ्याने आपल्या शेतातच कलिंगड, खरबूज, कांदा आणि खरिपात पिकवलेल्या तांदळाची विक्री व्यवस्था उभी केली आहे. आपल्या शेतात पिकवलेला माल थेट ग्राहकांना विकून ते वर्षाकाठी वीस ते पंचवीस लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवत आहेत. थेट ग्राहकांना शेतमाल विक्री होत असल्यामुळे जास्त दरही मिळत असल्याचं नितीन सांगतात.
चांदखेड येथील नितीन गायकवाड हे खूप वर्षांपासून कमी रसायनांचा वापर करून शेती करतात. यामध्ये ते जास्तीत जास्त शेणखत जीवामृत, गुळ, गांडूळ खत, हिरवळीचे खत आणि सेंद्रिय निविष्ठांचा वापर करतात. कमी रसायनांचा वापर केल्यामुळे भाताला चांगला वास, कलिंगडाला चांगली चव आणि टिकवण क्षमता जास्त राहत असल्याचं ते सांगतात.
कोरोना काळात त्यांना शेतमाल विक्री करण्यास अडचणी आल्या आणि त्यांनी थेट ग्राहकांना शेतमाल विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि तिथून पुढे त्यांनी थेट ग्राहकांनाच शेतमाल विक्री करण्याचा निर्णय घेतला. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळानंतर ते तांदूळ, पालेभाज्या, फळभाज्या, कांदे आणि उन्हाळ्यामध्ये कलिंगड आणि खरबूज या फळांची विक्री थेट ग्राहकांना करतात.
ग्राहकांची विश्वासार्हता
नितीन यांच्याकडे खात्रीशीर रेसिड्यू फ्री किंवा कमी रसायनांचा वापर करून उगवलेला शेतमाल मिळत असल्याची खात्री ग्राहकांना आहे. थेट शेतातच विक्री व्यवस्था उभी केल्यामुळे ग्राहकांना शेतामध्ये कशा पद्धतीने पीक उगवले जाते हे प्रत्यक्ष बघायला मिळते. त्यामुळे ग्राहकांना नितीन यांच्या शेतमालावर विश्वास संपादन झाला असून ते जास्तीचे पैसे द्यायला तयार असतात.
थेट शेतात विक्री
कोरोना नंतर जे ग्राहक नितीन यांना जोडले गेले ते ग्राहक थेट आजही नितीन यांच्या शेतात येऊन शेतमालाची खरेदी करतात. शेतात आल्यानंतर आपल्या हाताने कलिंगड, खरबूज तोडणे, ताज्या पालेभाज्या तोडणे आणि त्या घरी घेऊन जाणे, यामध्ये ग्राहकांना खूप आनंद मिळतो. त्यामुळे अनेक ग्राहक थेट शेतामध्ये येऊन पालेभाज्या, फळे, कांदा, तांदूळ या शेतमालाची खरेदी करतात.
नफा
नितीन गायकवाड यांची चांदखेड येथे आठ एकर शेती आहे. त्यामधील तीन ते चार एकर बागायती शेती आहे. यामध्ये ते इंद्रायणी तांदूळ, पालेभाज्या, फळभाज्या, कांदा, कलिंगड खरबूज हे पिके पिकवतात. त्यासोबतच कांदा कांदा रोपे सुद्धा विक्री करतात. थेट ग्राहक विक्रीतून त्यांना वर्षाकाठी २५ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो.