तुषार वांढेकरअहमदनगर : स्ट्रॉबेरी म्हटलं की, डोळ्यासमोर महाबळेश्वर, पाचगणी या परिसरातील स्ट्रॉबेरीची शेती दिसते. स्ट्रॉबेरी पीक हे फक्त थंड हवेच्या ठिकाणी दिसून येते; पण नेवासा तालुक्यातील सोनई परिसरातील कुंभार वस्ती येथे एका शेतकऱ्याने २० गुंठे जमिनीवर स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवीत त्यामधून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.
सोनई परिसरातील कुंभार वस्ती येथे शांताराम अशोक देवतरसे या शेतकरी कुटुंबाकडे १ एकर १० गुंठे शेती आहे. ते शेतामध्ये सोयाबीन, तूर, ज्वारी, गहू, ऊस ही पारंपरिक पिके घेतात. देवतरसे यांचा नावीन्यपूर्ण शेती करण्याकडे जास्त कल आहे. नगर जिल्ह्यात स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वर, पाचगणी व आजूबाजूच्या परिसरातून अहमदनगर जिल्ह्यात विक्रीसाठी येते. त्याला दोन दिवस लागतात. त्यामुळे आपल्याच जिल्ह्यात ती स्ट्रॉबेरी पिकवली, तर त्यांनी विचार केला आणि कृतीत आणला.
देवतरसे यांच्या पत्नी अर्चना, भाऊ संदीप हे सकाळी स्ट्रॉबेरी तोडून पॅकिंग करून राहुरी मार्केटमध्ये व छोट्या-मोठ्या विक्रेत्यांकडे पोहोच करतात. रोज २० ते ३० किलो स्ट्रॉबेरी १५० ते २०० रुपये किलोप्रमाणे ते विकतात. दरम्यान, प्रतिकूल हवामान असतानाही देवतरसे कुटुंबांनी सोनई शिवारात स्ट्रॉबेरीचे पीक घेऊन ते यशस्वी करून दाखविले आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. रोपे लावण्यापासून ते फळ तोडणीपर्यंत कधीकधी मजूर मिळत नाहीत. मजूर सांगतात स्ट्रॉबेरीचे काम आम्ही कधी केले नाही. त्यामुळे घरातील सर्व कुटुंब आम्ही तोडणीपासून ते पॅकेजिंगपर्यंत ही सर्व कामे आम्ही घरीच करतो, असेही देवतरसे कुटुंबीयांनी सांगितले.
पुणे येथून आणली रोपेपुणे येथून एका नर्सरीमध्ये जाऊन त्यांनी १० हजार रोपे आणली. त्यांना १ रोप साडेआठ रुपयांना मिळाले. वाहतूक खर्च मिळून प्रतिरोप १० रुपयांना ते पडले.
सहा महिन्यांत आठ लाख रुपयांचे उत्पन्न• ऑक्टोबर ते मार्च या ६ महिन्यांत स्ट्रॉबेरी फळ पिकाला नगर जिल्ह्यात चांगले पोषक वातावरण असते.• या सहा महिन्यांमध्ये जवळपास सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न देवतरसे कुटुंब घेतात.• कमी जागेत भरघोस उत्पन्न त्यांना मिळते.
शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. हे खरे असले तरी शेतकरी मित्रांनी थोडी डिजिटल शेती केली पाहिजे. स्ट्रॉबेरीला १५० ते २५० रुपयांपर्यंत भाव कायम मिळतो. येथील पारंपरिक शेतीमधील कोणत्याच पिकांना एवढा भाव मिळत नाही. कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे पीक म्हणजे स्ट्रॉबेरीचे पीक आहे. आपल्या जिल्ह्यात बाहेरून ट्रान्स्पोर्टद्वारे माल येतो. आपण आपल्या जिल्ह्यात रोज ताजी स्ट्रॉबेरी ग्राहकांना व विक्रेत्यांना देऊ शकतो. - शांताराम देवतरसे, प्रगतशील शेतकरी, सोनई