Join us

Orchard Farming Success Story : उच्चशिक्षित पती-पत्नीने फळबाग शेतीतून शोधला 'प्रगती'चा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 11:27 IST

Orchard Farming Success Story : शिरापूर येथील सावनकुमार तागड व पत्नी प्रगती तागड या उच्चशिक्षित पती- पत्नीने नोकरीच्या मागे न लागता केसर आंब्याची लागवड करून आर्थिक उन्नतीचा मार्ग शोधला आहे. पाच वर्षांत दोन लाख रुपये बागेवर खर्च करून दहा लाखांचे उत्पन्न त्यांनी मिळविले आहे.

नितीन कांबळे

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील सावनकुमार तागड व पत्नी प्रगती तागड या उच्चशिक्षित पती- पत्नीने नोकरीच्या मागे न लागता केसर आंब्याची लागवड करून आर्थिक उन्नतीचा मार्ग शोधला आहे. पाच वर्षांत दोन लाख रुपये बागेवर खर्च करून दहा लाखांचे उत्पन्न त्यांनी मिळविले आहे.

नोकरी मागे न लागता शिक्षण व ज्ञानाचा उपयोग करून घेत सोशल मीडिया, कृषी प्रदर्शनाला भेटी देऊन अभ्यास करत सावनकुमार व प्रगती यांनी आधुनिक शेतीचा निर्णय घेतला. पाच वर्षांपूर्वी बीड येथून केसर आंब्याची ४०० झाडे आणली.

त्यांची दोन एकर जिरायत क्षेत्रात १५ बाय १५ पद्धतीने लागवड करत ठिंबक सिंचनातून पाण्याची सोय केली. लागवड, फवारणी, मजुरी व इतर, असा दोन लाख रुपये खर्च झाला. मागील वर्षीपासून फळ धारणा सुरू झाली. सुरुवातीला दोन लाख व यंदा आठ लाख, असे दहा लाखांचे उत्पन्न मिळाले.

नोकरी करून इतरांच्या ताब्यात राहण्यापेक्षा उत्तम शेती केल्याने आर्थिक उन्नतीचा मार्ग शोधला आहे. यासाठी पत्नी प्रगतीची देखील खंबीर साथ मिळाल्याने शेतीत मोती पिकवले गेले आहेत.

तरुणांनी योग्य मार्गदर्शन घेऊन शेती केल्यास आर्थिक चणचण भासत नसून आपणच आपला मालक व यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर मालामाल होतो. जिद्द, चिकाटी व मेहनतीची गरज असल्याचे तागड दाम्पत्याने दाखवून दिले आहे.

सेंद्रिय खतासाठी पाळल्या सात गाई

■ फळबागेला रासायनिक खत न देता शेतीला पोषक व सेंद्रिय खत मिळावे म्हणून सात गाई पाळल्या आहेत. जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायदेखील होतो.

■ सोशल मीडियाचा आधार घेऊन शेतीत आर्थिक क्रांती घडू शकते, हे मी सिद्ध केल्याचे शिरापूर येथील उच्चशिक्षित प्रगतशील शेतकरी सावनकुमार तागड यांनी 'लोकमत'ला सांगितले.

भगव्या डाळिंबाची एक हजार झाडे

उच्चशिक्षित असताना मनात कसलाही संकोच न ठेवत शेतीत पूर्ण वेळ दिल्याने आज आमची आर्थिक घडी चांगली बसली आहे. नगर, पुण्याच्या बाजारपेठेत चांगली मागणी असून, स्थानिक व्यापारीदेखील घरी येऊन ठोक पद्धतीने फळे घेऊन जातात. महिलांनीदेखील उत्तम शेती करावी, असे उच्चशिक्षित प्रगतशील महिला शेतकरी प्रगती सावनकुमार तागड यांनी 'लोकमत'ला सांगितले.

तालुक्यात दहा हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग शेती असून, यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून शेतकरी लाभ घेत आहेत. फळबागेला लागणाऱ्या संरक्षित पाण्याची सोय म्हणून शेततळ्यांची संख्या वाढल्याने शेतकरी फळबागेकडे वळत आहेत. त्यांना कृषी विभागाकडून आवश्यक ते मार्गदर्शन केले जाते. - गोरख तरटे, तालुका कृषी अधिकारी, आष्टी.

हेही वाचा - Success Story आत्महत्या करायला निघालेला मराठवाड्यातील तरुण; आज आहे चार चाकीत फिरणारा प्रगतीशील शेतकरी

टॅग्स :शेतकरीफलोत्पादनआंबाआंबाडाळिंबबीडआष्टीशेतीशेती क्षेत्रगायपीक व्यवस्थापनमराठवाडा