Join us

Farmer Success Story : खुटबावच्या युवा शेतकऱ्याची किमया दोडक्याच्या पिकातून तीन महिन्यांत साडेतीन लाखांचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 11:05 AM

युवक शेतकऱ्याने चिकाटीने केलेल्या दोडक्याच्या पिकातून तीन महिन्यात साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळवले असून यासाठी त्याने केलेले पिकाचे नियोजन आणि विक्री आदर्श ठरली आहे.

संदीप चाफेकरयवतः युवक शेतकऱ्याने चिकाटीने केलेल्या दोडक्याच्या पिकातून तीन महिन्यात साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळवले असून यासाठी त्याने केलेले पिकाचे नियोजन आणि विक्री आदर्श ठरली आहे.

खुटबाव (ता. दौंड) येथील शेतकरी विक्रम रावसाहेब शेळके असे युवक शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने आई संगीता शेळके, पत्नी निकिता शेळके व शिक्षण घेत असलेला भाऊ सौरभ शेळके यांच्या मदतीने एक एकर शेतात दोडका पिकाची लागवड केली.

यासाठी त्याने योग्य नियोजन केले. पिकाला लागणारी खते, कीटकनाशके फवारणी, बांधणी आणि पीक आल्यानंतर त्याची तोडणी व स्वतः मार्केटमध्ये जाऊन विक्री असे नियोजन केले. कष्टाचे फळ त्यांना चांगले मिळाल्याने शेळके कुटुंब आनंदात असून यापुढे देखील असेच वेगळे प्रयोग शेतात करण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.

भांडगाव ते खुटबाव रस्त्यालगत शेळके कुटुंबाची शेती आहे. त्यातील एक एकर शेतीत त्यांनी दोडके लावले. दोडका पीक लावल्यानंतर ४५ दिवस पीक चालू होण्यास लागतात. पुढील ४५ दिवस दोडके उत्पन्न चालू होते.

पीक लागवड करण्याआधी त्यांनी शेतात दहा ट्रॉली शेणखत टाकले होते. यामुळे त्यांचे पीक चांगलेच जोमात आले. दोडका पिकाची लागवड केल्यानंतर पाहिल्या ४५ दिवसात त्यांनी काकडी व टोमॅटोचे अंतर पीक घेतले.

त्यातून त्यांना एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्या एक लाख रुपयात त्यांचा झालेला खर्च पूर्णपणे निघाला. आता ४५ दिवसांनी सुरू झालेल्या दोडक्याचे उत्पन्न त्यांचा पूर्णपणे नफा आहे.

४५ दिवसानंतर सुरू झालेले दोडक्याच्या तोडण्यासाठी आई, पत्नी व भावासह गरज पडल्यास कामगार घेतले. रोज १५० किलो माल त्यांना निघत होता.

एका किलोसाठी त्यांना ७० ते ९० रुपयांचा बाजारभाव मिळाला. निघालेले पीक विक्रीसाठी स्वतः मांजरी येथील मार्केटमध्ये घेऊन जात असल्याने अधिकचे पैसे मिळाल्याचे विक्रम शेळके यांनी सांगितले.

कष्टाचे चीज झाले■ कुटुंबाने शेतीत केलेली चिकाटी आणि योग्य नियोजन यामुळे दोडक्याच्या पिकातून केवळ तीन महिन्यात साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळाले. भाऊ महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानादेखील सुट्टी असली की तो राबायचा.■ आई आणि पत्नीनेदेखील कष्ट घेतले. विक्रीसाठी स्वतः जात असल्याने अधिकचा नफा मिळाला. घेतलेल्या अंतर पिकातून झालेला खर्च निघाला यामुळे आता मिळालेले उत्पन्न निव्वळ नफा आहे.■ आम्ही आमच्या कष्टाचे चीज झाल्याने आनंदी असल्याची प्रतिक्रिया युवक शेतकरी विक्रम शेळके यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

अधिक वाचा: शेतमालावर प्रक्रिया करून त्याची किंमत वाढविण्यासाठी शासनाची ही योजना देतेय अनुदान वाचा सविस्तर

टॅग्स :शेतकरीशेतीपीकपीक व्यवस्थापनभाज्यादौंड