विठ्ठल बोळे
डोंगरगाव : शेतीला जोडधंद्याची साथ मिळाली तर शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होते. अशीच संकल्पना प्रत्यक्षात उतरवित अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव येथील एका उच्चशिक्षित तरुणाने दुग्ध व्यवसाय व कुक्कुटपालनातून प्रगती साधली.
तसेच या माध्यमातून १२ ते १५ कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला आहे. कौस्तुभ शिरीष देशमुख यांनी बी. ई. एम.टेक. (इले.) ) मध्ये शिक्षण घेतले. पुढे नोकरीच्या मागे न लागता शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाची कास धरली.
दुग्ध व्यवसाय ठरतोय फायदेशीर
गावातच रोजगार निर्माण व्हावा, याकरिता सुरुवातीला ३ म्हशी विकत आणल्या व व्यवसाय सुरू केला. नंतर कालांतराने दुधाची मागणी वाढल्याने आणखी म्हशी विकत आणल्या. ४० ते ४५ म्हशींची संख्या झाली. याकरिता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून ३५ बाय ५० चे टीनशेड बांधले. त्यामध्ये कुलर, पंखे, लाईटची सोय केली. यामधून दिवसाला २५० ते ३०० लिटर दुधाची विक्री होते.
...म्हणून पक्ष्यांच्या संगोपनासाठी मदत
कुक्कुटपालन करताना २४ तास विद्युत पुरवठा सुरू राहण्याकरिता ६३ केव्हीएचे रोहित्र बसविले तर बऱ्याचवेळा अचानक विद्युत पुरवठा खंडित होऊन नुकसान होऊ नये म्हणून ६३ केव्हीएचे जनरेटर बसविले, त्यामुळे पक्ष्यांचे संगोपन करण्याकरिता मदत होते. याकरिता तीन-चार मजूर नेहमी कार्यरत असतात.
● दुग्धव्यावसायासोबतच पर्यावरणपूरक पोल्ट्री फार्म (कुक्कुटपालन) व्यवसायाला सुरुवात केली.
● सुरुवातीला दोन-अडीच हजार पक्ष्यांचे साधे शेड उभारणी करून काही दिवसानंतर अमरावती येथील कंपनीशी करार पद्धतीने पक्ष्यांचे संगोपन करण्यास सुरुवात केली.
● कालांतराने ईसी शेडचे बांधकाम केले. ईसी हे संपूर्णतः स्वयंचलित यंत्रणा असून, पर्यावरणपूरक असल्याचे त्यांनी सांगितले.