एकत्रित कुटुंबांच्या शेतीची यशस्वी धुरा सांभाळत तरुण पिढी आज आधुनिक बदलांसह फायदेशीर शेती करत आहे. याच बदलांत देवगाव (ता. नेवासा) येथील विशाल आपल्या पारंपरिक ऊस पिकाला फाटा देत आता केळीची शेती करत आहे. ज्यात त्याने अल्पावधीत चांगला जम देखील बसवला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील देवगाव (ता. नेवासा) येथील हरिभाऊ व शिवाजी सखाराम आगळे या दोन भावांच्या एकत्रित परिवाराला वडीलोपार्जित एकूण ३० एकर क्षेत्र आहे. ज्यात यंदा ४ एकर केळी, ९ एकर काढणीयोग्य ऊस, ९ एकर नव्याने लागवड केलेला ऊस, आणि उर्वरित क्षेत्रात उन्हाळा कांदा रोप वाटिका, आले, मका आहेत.
वडिलांच्या गंभीर अपघातांमुळे ते एका जागी असल्याने बाहेर नोकरी न करता विज्ञान शाखेचा पदवीधर असलेला विशाल आज वडिलांच्या जागी काकांच्या मदतीसाठी पूर्णवेळ शेतीत आहे. त्याने काकांच्या पारंपरिक ऊस शेतीला फाटा देत गेल्या पाच वर्षांपासून केळी शेती सुरू केली आहे. ऊस शेतीत असलेल्या तो आता केळीच्या दिशेने वळल्याचे सांगतो.
वर्षभरात जागेवर मिळतात हातात पैसे
पारंपारिक ऊस शेतीत तोड वेळेवर न होणे यासह तब्बल १८ महिन्यांचा काळ उलटूनही पैसे वेळेत हातात येत नसे. मात्र केळी शेती करतांना अवघ्या १२ महिन्यांच्या काळात शेतात तोड होताच जागेवर पैसे मिळत असल्याचे विशाल सांगतो.
ऊसाच्या तुलनेत सरस पीक
अलीकडे ऊसाचा पेरा कमी झालेला दिसून येत आहे. त्यात उत्पादन खर्चदेखील प्रचंड वाढला आहे. तर दुसरीकडे केळीमध्ये ठिबकचा वापर होत असल्याने पाणी देण्याच्या कष्टात बचत झाली आहे, तसेच ऊसाच्या तुलनेत प्रवाही मेहनत कमी झाली आहे.
केळी बागेच्या व्यवस्थापनेतील ठळक बाबी
अत्याधुनिक २० एमएम ठिबकद्वारे सिंचनाची व्यवस्था करून ५ बाय ५ अंतरावर टिश्यू कल्चर केळींच्या रोपांची लागवड केली जाते. पुढे ३०-९०-१८० व्या दिवशी बांगडी पद्धतीने झाडाला रिंगण घालून खतांचा बेसळ डोस दिला जातो. ज्यातून एकरी २०-३० केळी टन उत्पादन घेतले जाते. तर यासाठी १६ रुपये प्रती रोप या प्रमाणे पोहच केळींच्या रोपांची खरेदी होते. तर बाजारभावाचा अंदाज घेऊन विक्री केली जाते.
तरुणाईने शेतीची वाट धरावी
गावाकडे ५-१० एकर क्षेत्र असताना देखील अनेक उच्च शिक्षण घेतलेले तरुण आज शहरात केवळ १५-२० हजारांच्या पगारावर काम करत आहेत. त्यातुलनेत जर या तरुणांनी आपापली शेती प्रगत केली, प्रवाही पिकांच्या पद्धतीत बदल करून आधुनिकतेने उत्पादन वाढविले, तर नक्कीच शहरपेक्षा अधिक पगार देखील मिळेल. सोबत तो परिवार ते गाव शेती समृद्ध होईल. - विशाल शिवाजीराव आगळे, देवगाव.