Join us

Farmer Success Story : बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता प्रवीणने मिळवलं शेतीत प्राविण्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 2:55 PM

बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्णय संगमेश्वर तालुक्यातील किरदाडी येथील प्रवीण नारायण पेडणेकर यांनी घेतला.

मेहरून नाकाडेरत्नागिरी : बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्णय संगमेश्वर तालुक्यातील किरदाडी येथील प्रवीण नारायण पेडणेकर यांनी घेतला.

भात, हळद, भाजीपाला, काळीमिरी, आंबा, काजू, नारळ उत्पादनासह पूरक दुग्धोत्पादन व्यवसाय करून त्यातून ते अर्थार्जन करत आहेत.

सुरुवातीला त्यांनी पडीक जमिनीची साफसफाई करून त्यामध्ये १५०० काजू, १०० हापूस आंबा, ३० नारळाची लागवड केली. आंबा, नारळ झाडावर त्यांनी आंतरपीक म्हणून काळीमिरी लागवड केली आहे.

खरीप हंगामात एक एकर क्षेत्रावर ते भात लागवड करत असून, उत्पादित भात कुटुंबीयांसाठी ठेवत आहेत. १० ते १५ गुंठे क्षेत्रावर हळद लागवड करतात.

इतकेच नव्हे, तर आंबा बागेत चिबूड, काकडी, दोडकी, पडवल, भोपळा, दूधी भोपळा या वेलवर्गीय फळभाज्यांची लागवड करतात. भात काढल्यानंतर मुळा, माठ, हिरवी मिरचीची लागवड करतात.

शिवाय दुभत्या जनावरांना ओला चारा मिळावा, म्हणून मका लागवड करत आहेत. शेतीला पूरक दुग्धोत्पादन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्याकडे दुभती दहा जनावरे आहेत. गावातील शेतकऱ्यांना एकत्र घेत दुग्धसंस्थेची स्थापना केली आहे.

गावातील शेतकऱ्यांकडील दररोज ३०० लिटर दूध संकलन करून दुग्धप्रक्रिया कंपनीला दिले जाते. प्रवीण यांच्याकडील २५ ते ३० लिटर दूध डेअरीला घातले जात आहे. शिवाय खासगी विक्रीही करतात.

शेतीसाठी शेणखताचा वापर ते सर्वाधिक करतात. उर्वरित शेण विक्री करतात. शेतमाल विक्री व्यवसायासाठी गावातील अन्य शेतकऱ्यांना ते सतत मार्गदर्शन करतात.

दर पाहून विक्रीकाजू, आंबा, नारळ, काळीमिरी, हळद असो वा अन्य भाजीपाला विक्रीपूर्वी दर पाहूनच निर्णय घेत असल्याचे प्रवीण यांनी सांगितले. दरवर्षी ६० ते ७० किलो वाळलेली काळी मिरी विकत असल्याची माहिती त्यांनी दिली. आंब्याची बाजारात, तसेच खासगी विक्री करतात. ओला, वाळलेला काजूगर, तसेच वाळलेली बी विक्री करतात. ग्राहकांची मागणी व दर पाहून याप्रमाणे विक्री करतात. ओल्या काजूगराला चांगला दर मिळतो.

काकडी, चिबूड विक्रीबागायतीमध्ये खरीप हंगामात फळभाज्यांचे आंतरपीक प्रवीण घेतात. गणेशोत्सव ते दसऱ्यापर्यंत काकडी, चिबूड, पडवळ, दोडकी, दुधी भोपळा, तांबडा भोपळ्याचे पीक मिळते. गावातच विक्री होते. हळदसुद्धा पावडर करूनच विकत असल्याचे प्रवीण यांनी सांगितले. पावसाळ्यानंतर हिरवी मिरची लागवड करीत असून, मिरचीचेही चांगले उत्पन्न मिळते. पालेभाज्यांचाही खप शेताच्या बांधावर होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

विविध प्रकारची पिके घेत असताना, त्याचे योग्य नियोजन गरजेचे आहे, शिवाय मार्गदर्शनही महत्त्वाचे आहे. मला शेतीसाठी कृषी सहायक जी. डी. शिंदे, पर्यवेक्षक उदय कदम, मंडळ कृषी अधिकारी पी. बी. काळे, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र माने यांचे मार्गदर्शन मिळते. शेती असो वा अन्य शासकीय समस्या शेतकरी, ग्रामस्थांपर्यंत पोहचविण्यासाठी सक्रिय असतो. दुग्धसंकलन संस्थेमुळे गावातील शेतकऱ्यांनी दुग्धोत्पादन व्यवसाय सुरु केला असून, गावातच विक्री करणे त्यामुळे सुलभ झाले आहे. केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता, विविध पिके घेऊन त्याची विक्री स्वतः करता आली पाहिजे. - प्रवीण नारायण पेडणेकर, किरदाडी, ता. संगमेश्वर

टॅग्स :शेतकरीशेतीपीककोकणरत्नागिरीभाज्याफळेपीक व्यवस्थापन