Join us

Farmer Success Story : स्वतःच्या शेतीबरोबर भाडे तत्वावर शेती घेऊन हे दांपत्य घेत आहे बारमाही उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 12:25 PM

दापोली तालुक्यातील सरंद ब्राम्हणवाडी येथील अनिल सीताराम जोशी व अक्षया अनिल जोशी यांनी या तंत्राचा अवलंब केला असून, त्याचा त्यांना फायदा झाला आहे. जोशी दाम्पत्य बारमाही शेती करत असून, शेतीतूनच उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे.

मेहरून नाकाडेरत्नागिरी: शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी कुणावर अवलंबून न राहता 'शेतकरी ते ग्राहक' थेट विक्रीच्या तंत्राचा अवलंब करावा, यासाठी शासनाकडून पाठपुरावा केला जात आहे.

दापोली तालुक्यातील सरंद ब्राम्हणवाडी येथील अनिल सीताराम जोशी व अक्षया अनिल जोशी यांनी या तंत्राचा अवलंब केला असून, त्याचा त्यांना फायदा झाला आहे. जोशी दाम्पत्य बारमाही शेती करत असून, शेतीतूनच उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे.

स्वतःच्या जमिनीबरोबर गावातील अन्य शेतकऱ्यांची जमीन भाड्याने घेऊन विविध पिकांची लागवड करत आहेत.

बाजारात एकाच प्रकारची भाजी विक्रीला नेण्यापेक्षा पाच ते सहा प्रकारच्या भाज्या नेल्या तर एकच ग्राहक एकावेळी विविध भाज्यांची खरेदी करतो, हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जोशी दाम्पत्य विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करीत आहेत.

खरीप हंगामात भात, नाचणी, वरी यासह दुधी भोपळा, काकडी, चिबूड, दोडकी, पडवळ, तांबडा भोपळा, भेंडीची लागवड करतात. पावसाळ्यानंतर रब्बी हंगामात कुळीथ, पावटा, चवळी, कडवा, वांगी, मिरची, कोबी, कलिंगड, वालीच्या शेंगा, टोमॅटो, सिमला मिरची, लागवड करून उत्पादन घेत आहेत.

याशिवाय मुळा, माठ, मेथी, पालक या पालेभाज्यांसह नवलकोल, वेलवर्गीय सर्व प्रकारच्या भाज्या करतात. शेताच्या कडेला शेवग्याची लागवड केल्याने त्यांच्याकडे शेवगासुद्धा विक्रीला असतो. 

बागायतीमध्ये १०० काजू व ३०० हापूस आंबा लागवड असून, स्वतःच आंबा, काजूची विक्री करत असल्याचे अक्षया जोशी यांनी सांगितले. सेंद्रिय खतांचा सर्वाधिक वापर करत असून, दर्जा, उत्पन्न सकस आहे. अक्षया स्वतः दापोलीत विक्री करतात. त्यामुळे फायदा होत असल्याचे सांगितले. 

वेलवर्गीय भाज्यांचा खपपावसाळ्यात वेलवर्गीय भाज्यांचा चांगला खप होतो. त्यामुळे लागवडीसाठी बियाणे निवडण्यापासून लागवड, खत/पाणी व्यवस्थापन, काढणी ते विक्रीसाठी अनिल व त्यांच्या पत्नी अक्षया विशेष श्रम घेतात. त्यांच्याकडे दोन गावठी गायी असून, गायीचे शेण शेतीसाठी वापरले जाते. गोमुत्रापासून जीवामृत तयार करून त्याचा वापर शेतीसाठी वापरत असल्याने त्याचा त्याला फायदा झाला असल्याचे सांगितले.

काजूगराला मागणीदापोलीत मुंबई/पुण्यासह राज्याच्या विविध भागातून पर्यटक येत असतात. पर्यटकांकडून ओल्या काजूगरासाठी वाढती मागणी आहे. त्यामुळे सुरुवातीला ओले काजूगर काढून विक्री करतात. तर, उर्वरित वाळलेली बी संकलित करून चांगला दर पाहून विक्री करत असल्याचे सांगितले. काजू उत्पादनासाठी आंब्याप्रमाणे विशेष मेहनत करावी लागते. पर्यटकांकडून चिबूड, काकडी तसेच अन्य भाज्यांसाठी चांगला प्रतिसाद लाभतो.

परिस्थितीमुळे शालेय शिक्षण पूर्ण करता आले नाही, मात्र आठवीनंतर शेतीकडेच लक्ष केंद्रित केले. भाज्या विक्रीतून चांगला फायदा असल्याचे अभ्यासाअंती समजले. त्यामुळे विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करून उत्पादन मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक/गावठी भाज्यांना वाढती मागणी आहे. त्यातच सेंद्रिय शेती असल्यामुळे ग्राहक सांगाल तो दर द्यायला तयार असतात. शेतमाल विक्रीसाठी कोणावरही अवलंबून न राहता थेट विक्रीवर भर आहे. शेतीच्या प्रत्येक कामासाठी पत्नी अक्षयाची भक्कम साथ लाभत आहे. बारमाही शेतीबरोबर बारमाही भाजी विक्रीचा स्टॉल दापोलीत लावण्यात आला आहे. - अनिल जोशी, सरंद, दापोली

अधिक वाचा: बिहारच्या उच्च शिक्षित तरुणाने नोकरी सोडून कोकणच्या मातीत पिकवली लाल भेंडी

टॅग्स :शेतीशेतकरीरत्नागिरीआंबाभाज्याबाजारपीकगाय