मेहरून नाकाडेरत्नागिरी : बीजप्रक्रिया, योग्य सेंद्रिय व रासायनिक खत व्यवस्थापन, बेणणी वेळेवर करून अविरत परिश्रमांमुळे दापोली तालुक्यातील चंडिकानगर येथील प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत रघुनाथ म्हातले यांनी अवघ्या २४ गुंठ्यात १९२ क्विंटल भाताचे उत्पन्न मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत.
राज्य शासनाने आयोजित केलेल्या पीक स्पर्धेत चंद्रकांत प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. चंद्रकांत म्हातले खरीप हंगामात भातशेती व उन्हाळ्यात आंबा, काजू उत्पादन घेत आहेत.
त्यांच्याकडे १० जनावरे आहेत. काही दुधाची विक्री तर काही घरात ठेवले जाते. मात्र जनावरांचे शेण व गोमूत्रापासून खत, जीवामृत तयार करून त्याचा वापर पिकासाठी करत आहेत.
आंबा बागेतच कृषी पर्यटन केंद्र सुरू केले असून, पर्यटकांची गर्दी सातत्याने असते. बागेतच हॉटेल उभारल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांकडून आंबा खरेदी केली जाते. त्यामुळे उत्पादित आंबा अन्यत्र विक्रीसाठी न पाठविता जाग्यावरच विक्री करतात.
चंद्रकांत यांनी लागवड केलेल्या ३०० काजू झाडांपासून उत्पादन सुरू झाले आहे. ओले काजूगर विक्रीवर त्यांचा विशेष भर आहे. शेती व्यवसायावर आधारित पूरक व्यवसाय ते करीत असले तरी शेतीतून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यावर त्यांचा सर्वाधिक भर आहे.
त्यामुळे शासनातर्फे आयोजित स्पर्धेत सहभागी होत भरघोस उत्पादन मिळविण्याचे बक्षिस त्यांनी मिळविले आहे. कृषी विभागाचे मार्गदर्शनही मिळत आहे. स्वतःचेही परिश्रम अधिक आहेत.
ओल्या काजूगरांचा खपदापोलीमध्ये पर्यटकांची वर्दळ सातत्याने सुरू असते. ओल्या काजूगराला पर्यटक, स्थानिकांकडून वाढती मागणी आहे, त्यामुळे वाळलेल्या काजू बी पेक्षा ओला काजूगर काढून विक्री करतात. ओल्या काजूगराला मागणी अधिक असल्यामुळे दरही चांगला मिळतो. हॉटेल असल्याने आंबा, काजू गर विक्रीसाठी स्वतंत्र स्टॉलची आवश्यकता भासत नाही. विक्रीवरही त्यांचे अधिक लक्ष असते.
विक्रमी उत्पन्नम्हातले यांनी गतवर्षी (२०२३) च्या खरीप हंगामात गुजरात ११ या भाताच्या वाणाची लागवड केली होती. या वाणापासून ३५ ते ४० क्विंटल भात मिळेल असा कंपनीचा दावा आहे. परंतु कंपनीचा दावा त्यांनी मोडला आहे. योग्य नियोजन, परिश्रमामुळे २४ गुंठ्यात १९२ क्विंटल भात उत्पादन मिळविले आहे. त्यांनी मिळविलेल्या विक्रमी उत्पन्नामुळेच शासनाच्या पीक स्पर्धेत यशाची मानकरी ठरले आहेत.
भात पेरणीपूर्व बियाण्याची बीजप्रक्रिया केली होती. पेरणीनंतर १० ते १२ दिवसांतच रोप काढून उथळ लागवड केली. लागवडीवेळी हिरवळीच्या खतांचा वापर केला होता. शिवाय शेणखत, नॅनो युरियाचा वापर केला होता. सुफला खताची मात्रा दोन वेळा दिली होती. भात खाचरात उगवलेले तण काढणी दोन वेळा केली. योग्य मशागतीमुळे भात रोपांची वाढ जोमदार होऊन भरघोस उत्पन्न मिळाले. तालुका, जिल्हा, विभागीय व राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचेही मला सातत्याने मार्गदर्शन लाभले. सर्वाच्या एकत्रित परिश्रमामुळे अधिक उत्पन्न मिळवण्यात आले आहे. - चंद्रकांत रघुनाथ म्हातले
अधिक वाचा: Women Farmer Success Story : सुनीता गोताड यांनी शेती व खतनिर्मितीतून शोधला उत्पन्नाचा मार्ग