मेहरून नाकाडे
रत्नागिरी : बारावी पूर्ण झाल्यानंतर सैन्य भरतीमध्ये सहभागी झाले, मात्र निवड झाली नाही. देशसेवेची इच्छा असल्याने होमगार्डमध्ये भरती झाले. पाच वर्षे सेवा बजावली. नंतर 'जय जवान जय किसान' या घोषवाक्याने प्रेरित होत राजापूर तालुक्यातील गोठणे-दोनिवडे येथील संतोष तुकाराम राघव यांनी भूमीची सेवा करण्याचे निश्चित केले.
गेली दहा-बारा वर्षे शेती करत असून विविध पिके घेत आहेत. संतोष यांची स्वतःची जमीन डोंगराळ भागात आहे. त्याठिकाणी आंबा, काजू लागवड केली आहे. भातशेतीचे क्षेत्र कमी आहे. मात्र त्यांनी नदीलगतची पडीक जमीन भाडे कराराने घेत त्यामध्ये विविध पिकांचे उत्पादन घेत आहेत.
खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामात नियोजन करून विविध पिके टप्प्याटप्प्याने घेत आहेत. खरिपात तीन एकर क्षेत्रावर भात लागवड करतात. यावर्षी त्यांनी 'रत्ना आठ', वाडा कोलम, मधुमती वाणाची लागवड केली आहे.
भात काढल्यानंतर मुळा, माठ, मिरची, वालीच्या शेंगा, कांदा, बटाटा, कोबी, कलिंगड, झेंडू, सूर्यफूल लागवड करीत आहेत. प्रत्येक पिकासाठी नियोजन करून लागवड करत आहेत. पिकाचा उत्तम दर्जा व भरघोस उत्पादन राखणे त्यांचे उद्दिष्ट आहे.
विक्रीसुद्धा ते स्वतःच करतात. कोकणातील लाल मातीत विविध प्रकारची पिके घेता येतात, हे संतोष यांनी सिद्ध केले आहे. पत्नी सुश्मिता, भाऊ अकुंश व नीलेश यांची भक्कम साथ लाभत असल्याचे सांगितले.
आंब्याची खासगी विक्री
संतोष यांची स्वतःची ५० ते ६० आंबा कलमे आहेत. परंतु ५०० आंबा कलमे कराराने घेत उत्पादन घेत आहेत. तसेच स्वतःची १०० काजू कलमे आहेत, मात्र ७०० काजू कलमे कराराने घेत काजू बी उत्पादन घेत आहेत. आंबा बाजारात न पाठवता खासगी विक्री करतात. तर काजू बी सुद्धा योग्य दर पाहून विक्री करतात. संतोष आणि त्याचे शेतकरी मित्रांनी एकत्रित येत फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे.
झेंडूला मागणी
अतिपावसामुळे झेंडू पिकाचे नुकसान होते. त्यामुळे पावसाळ्यानंतर संतोष झेंडू लागवड करतात. त्यामुळे नवरात्र, दसरा, दिवाळी, मार्गशीर्ष महिन्यात फुलांचा खप भरपूर होतो. दरही चांगला मिळतो, शिवाय पाऊस नसल्यामुळे नुकसानही फारसे होत नाही. सूर्यफूल लागवड करून उत्पादन घेत बियांपासून तेल तयार करीत आहेत. सूर्यफूलाचेही चांगले उत्पन्न मिळते, हे संतोष यांनी सिद्ध केले आहे.
देशसेवा करण्याची इच्छा होती, मात्र शक्य झाले नाही. त्यामुळे शेतीच्या माध्यमातून भूमीची सेवा करत आहे. खरिपात फक्त भात पिक घेतो. भात कापणीनंतर मुळा, माठ पालेभाज्या, वांगी, कोबी, मिरची, वालीशेंगा, काही क्षेत्रावर कलिंगड, झेंडू, सूर्यफूल लागवड करतो. कांदा, बटाटा लागवड केली होती. कांद्यापेक्षा बटाटा पीक उत्तम येते. कोकणात शिमगा उत्साहात साजरा केला जात असल्यामुळे या दिवसात कलिंगड बाजारात येईल या पद्धतीने लागवड करतो, चांगला खप होतो. प्रत्येक पिकाचे उत्पादन घेताना नियोजन करून लागवड करतो. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला की, शेतीतून चांगले उत्पन्न मिळते, हा अनुभव आहे. - संतोष तुकाराम राघव, गोठणे-दोनिवडे
अधिक वाचा: भात पिकात खतं देण्याचं हे आहे सोपे तंत्र वाचा सविस्तर