Join us

Farmer Success Story : उत्पादन खर्चात बचत करत टोमॅटोनंतर केली काकडीची लागवड; २५ गुंठ्यात १८ टन उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 12:45 IST

आष्टा येथील प्रगतशील शेतकरी नितीन विद्याधर वाडकर यांनी २५ गुंठे काकडीतून सुमारे साडेतीन लाखांचे उत्पादन घेतले आहे.

सुरेंद्र शिराळकरआष्टा येथील प्रगतशील शेतकरी नितीन विद्याधर वाडकर यांनी २५ गुंठे काकडीतून सुमारे साडेतीन लाखांचे उत्पादन घेतले आहे.

पारंपरिक ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वाडकर यांनी भाजीपाला, काकडीसारखे पीक घेऊन तोट्यातील शेती फायद्यात कशी येऊ शकते, हे दाखवून दिले आहे.

नितीन वाडकर यांनी भाजीपाला पिकाला प्राधान्य दिले आहे. त्यांची केवळ २५ गुंठे जमीन आहे. या शेतीची त्यांनी उभी आडवी नांगरट करून शेणखत विस्कटले. साडेपाच फूट सरी पाडली. यावर त्यांनी टोमॅटोचेपीक घेतले.

टोमॅटोचा हंगाम संपल्यानंतर मल्चिंग केलेल्या सरीवर साडेपाच बाय सव्वा फुटावर नाझिया जातीच्या काकडीची १४ ऑक्टोबर रोजी टोकन केली. या काकडीला ठिबकच्या साह्याने नियमित पाणी दिले.

सेंद्रिय, रासायनिक खते ठिबकच्या साह्याने दिली. तसेच नागअळी, दावण्या, भुरी या रोगासाठी औषधांची फवारणी केली. सुमारे ४० ते ४५ दिवसांनंतर काकडीचा तोडा सुरू झाला आहे.

टोमॅटोसाठी वापरलेल्या तार व काठीचा आधार या काकडीला मिळाला आहे. २५ ते ४५ रुपयांपर्यंत काकडीला दर मिळाला आहे. सरासरी २५ ते २७ रुपये दर मिळाला.

एक दिवसा आड एक असे तोडे घेतले असून सुमारे ३५ ते ४४ किलो काकडी मिळत आहे. ही तोडलेली काकडी मुंबईला विक्रीसाठी पाठवली.

आज अखेर २५ तोड्यातून सुमारे १७ टनापर्यंत काकडीचे उत्पादन मिळाले. अजून एक टन उत्पादन मिळेल.

यातून सुमारे साडेतीन लाखांपर्यंत उत्पन्न मिळेल, असा नितीन वाडकर यांनी दावा केला आहे. नितीन वाडकर यांना बावची येथील धीरज कारंडे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

भाजीपाला पीक फायदेशीर१) ऊस शेती बरोबर भाजीपाला पिके नियमितपणे घेतो, गत वेळी टोमॅटोचे चांगले उत्पादन मिळाले होते. त्याच प्लॉटमध्ये काकडीचे पीक घेतले आहे. यालाही चांगला दर मिळाला.२) शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाकडे वळणे गरजेचे आहे, असे मत प्रगतशील शेतकरी नितीन वाडकर यांनी व्यक्त केले. भाजीपाला पिकामुळे जमिनीचा पोत चांगला राहतो, असेही ते म्हणाले.

अधिक वाचा: Farmer Success Story : वीस गुंठे उसातल्या मिरचीने या शेतकऱ्याला केले लखपती

टॅग्स :शेतीशेतकरीपीकसांगलीभाज्याऊसटोमॅटो