सुरेंद्र शिराळकर
आष्टा येथील प्रगतिशील शेतकरी अनिल रामचंद्र सिद्ध यांनी उसामध्ये मेथी व कोथिंबीरचे आंतरपीक घेऊन सुमारे सहा लाखांचे उत्पन्न घेतले आहे. पाणी, खताचे योग्य व्यवस्थापन केल्यास निश्चित शेती फायदेशीर आहे, असा विश्वास अनिल सिद्ध यांनी व्यक्त केला आहे.
अनिल सिद्ध यांची आष्टा ते तासगाव रस्त्यावर शेती आहे. या शेतीमध्ये त्यांनी ऊस, केळी, हळदीसह विविध पिके घेतली आहेत. त्यांनी आपल्या सहा एकर शेतीमध्ये उभी आडवी नांगरट करून शेणखत पसरले.
१५ ऑगस्टच्या दरम्यान साडेचार फूट सरी सोडून ८६०३२ उसाची दोन डोळा पद्धतीने कांडी लागवड केली. त्यानंतर उसाच्या भोड्यावर आष्टा येथील बाळासाहेब इंगळे यांच्याकडून गजराज मेथी खरेदी करून दीड एकर क्षेत्रावर ६० किलो मेथीची टोकन केली.
या उसाला व मेथीला ठिबक व भुई पाटाने पाणी दिले तसेच गंदर धने पाच एकर क्षेत्रावर टोकन केली. या मेथी व कोथिंबीरवर आठ ते दहा दिवसांनी बुरशीनाशक व कीटकनाशकाची फवारणी केली. कामगारांच्या साह्याने कोथिंबीर व मेथीची काढणी सुरू आहे.
सांगली, आष्टा, इस्लामपुर, वडगाव येथील व्यापाऱ्यांनी जागेवरूनच मेथी व कोथिंबीर खरेदी केली आहे. मेथीला २२०० रुपये शेकडा दर मिळाला असून एक लाखाचे उत्पादन मिळाले.
पाच एकर क्षेत्रामधून सुमारे २० हजार पेंडी कोथिंबीर मिळाली, शेकडा तीन ते साडेतीन हजार रुपये दर मिळाला. एकूण सुमारे पाच लाखांपर्यंत उत्पादन मिळाले.
अनिल सिद्ध यांनी मेथी व कोथिंबीरच्या आंतरपिकामधून एक ते दीड महिन्यात सहा लाखांचे उत्पादन मिळवीत युवा शेतकऱ्यांपुढे आदर्श घालून दिला आहे.
ऊसलागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. मीही सहा एकर उसाची लागवड केली. या उसामध्ये मेथी व कोथिंबीर आंतरपीक घेतले. सुमारे सहा लाखांचे उत्पन्न मिळाले. शेतकऱ्यांनी आंतरपीक घेतल्यास ते फायदेशीर ठरत आहे. उसाचेही एकरी ७५ ते ८० टन उत्पन्न मिळेल. - अनिल सिद्ध, प्रगतिशील शेतकरी, आष्टा