मेहरून नाकाडेरत्नागिरी: आई-वडील पारंपरिक पद्धतीने शेती करीत असल्याचे पाहिले; परंतु व्यावसायिक शेती कशी करायची, याची माहिती घेत, करबुडेतील भिकाजी धनावडे यांनी लाल मातीत विविध पिके घेण्याचे तंत्र अवगत केले आहे.
प्रयोगशील वृत्तीमुळे त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. निव्वळ शेतीच नाही तर 'शेतकरी ते ग्राहक' या संकल्पनेचा अवलंब करीत विक्रीही स्वतःच करीत आहेत. खरीप हंगामात ५० गुंठ्यांत भात लागवड, तर तीन गुंठ्यांत नाचणी लागवड करत आहेत.
भात, नाचणी विक्री न करता, कुटुंबीयांसाठी ठेवून देतात. भात, नाचणी काढल्यानंतर जमिनीच्या ओलाव्यावर विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करत आहेत. मुळा, माठ, पालक, मोहरी, कोथिंबीर, वांगी, मिरची, भेंडी, मटार, कोबी, फ्लॉवर लागवड करतात. याशिवाय झेंडूचे तर दोनवेळा उत्पादन घेतात.
प्रत्येक पीक लागवडीसाठी वाणाची निवड, योग्य खत-पाणी व्यवस्थापन यामुळे पिकाचा दर्जा उत्तम राखण्यात यश आले आहे. दर्जा उत्तम असल्यामुळे विक्रीसाठी भिकाजी यांना फारसे कष्ट घ्यावे लागत नाही, स्वतः ग्राहकच शेतावर येऊन खरेदी करतात.
बाजारभावापेक्षा कमी दर व उत्तम दर्जा असल्यामुळे विक्रीही हातोहात होते. झेंडू लागवड करताना पहिल्या टप्प्यात गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळीसाठी फुले कशी मिळतील, याचा विचार करून उत्पन्न घेतात.
दुसऱ्या टप्प्यात मार्गशीर्ष, शिमगोत्सवात फुले विक्रीला आणण्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. शेतीच्या कामासाठी पत्नी भाग्यश्री, मुलगे अभिषेक, संकेत यांची मदत मिळत आहे.
मटार लागवड प्रयोगपाव किलो मटार आणून भिजत ठेवले व त्याची लागवड प्रयोग म्हणून केली. योग्य खत व पाणी दिल्यामुळे पाव किलोत २० किलो मटार उत्पन्न घेण्यात भिकाजी यांनी यश मिळविले. जिल्ह्यातील लाल मातीत मटार चांगला होतो, हे त्यांनी सिद्ध केले. नर्सरीतून रोपे आणून लागवड केली तर आणखी चांगले उत्पन्न मिळविता येईल. त्याचप्रमाणे मटारच्या शेंगा व दाणे एकूणच दर्जा उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले.
कोबी, फ्लॉवर लागवडहिरवी मिरचीसोबतच सिमला मिरची, कोबी, फ्लॉवर, टोमॅटोची लागवड करून भिकाजी उत्पन्न मिळवीत आहेत. वाफे तयार करून त्यावर प्लास्टिक मल्चिंगवर नर्सरीतून रोपे आणून लागवड करतात. चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळते, असे भिकाजी यांनी सांगितले, प्रयोगशील वृत्तीमुळे निरनिराळ्या प्रकारची पिके घेत आहेत. हवामानातील बदलामुळे नुकसान झाले तरी न खचता पीक वाचविण्यासाठी प्रयत्न करतात.
खरीप हंगामात पावसाच्या पाण्यावर आई-वडील शेती करत असत, मी लहानपणापासून शेती पाहत असल्यामुळे आपण शेती करायची, असा निर्णय घेतला. भात, नाचणी, आंबा, काजूचे उत्पन्न घेत असताना भाजीपाला, फूलशेती करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक पीक लागवड करीत असताना अभ्यासपूर्वक वाणाची निवड केली. पाण्याच्या उपलब्धतेसाठी विहीर काढल्याने मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. नर्सरीतून काही रोपे विकत आणतो, तर काही रोपे स्वतःच तयार करतो. वन्यप्राण्यांचा त्रास होतो; परंतु मी व माझे कुटुंबीय रक्षणासाठी शेतावर असतो. यांत्रिक अवजारांचा वापर करीत असल्याने वेळ, श्रम, पैशांची बचत होत आहे. - भिकाजी सदू धनावडे