अतुल जाधव
देवराष्ट्रे : कष्ट, जिद्द व चिकाटीच्या जोरावर अशक्य गोष्टसुद्धा शक्य करता येते, हे आसद (ता. कडेगाव) येथील तरुण शेतकरी किरण अशोक जाधव यांनी ५५ गुंठे क्षेत्रात साठ दिवसांत कलिंगड पिकातून तब्बल पाच लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन दाखवून दिले आहे.
पारंपरिक ऊस पिकाला बगल देत पीक बदल करण्याच्या दृष्टीने युवा शेतकरी यांनी शेतामध्ये कलिंगड लागवड केली. यातून त्यांना खर्च वजा जाता तीन लाख ४७ हजार रुपये नफा झाला.
किरण जाधव यांनी पारंपरिक ऊस पिकात फायदेशीर उत्पन्न मिळत नसल्यामुळे आपल्या ५५ गुंठे जमीन क्षेत्रात योग्य प्रकारे नांगरट, मेहनत करून लागवडीची भेसळ मात्रा देऊन ठिबक व मल्चिंग पेपर अंथरूण ४ मार्च रोजी दीड फूट अंतरावर कलिंगड रोपांची लागवड केली.
कलिंगड रोपांच्या लागवडीनंतर पहिले दहा दिवस पाणी व आळवणी तसेच औषध फवारणी करून रोपांची योग्य वाढ होऊ दिली. त्यानंतर रासायनिक लागवड व टॉनिक यांचे डोस देणे चालू ठेवले. योग्य प्रमाणात लागवड, औषध यांची मात्रा दिल्यामुळे फळांची वाढ चांगल्या प्रकारे झाली.
त्यामुळे किरण जाधव यांनी ५५ गुंठे क्षेत्रात साठ दिवसांमध्ये हे विक्रमी तब्बल ४४ टन उत्पादन घेतले. त्यांनी एक लाख ४७ हजार रुपये खर्च केला. यासाठी कृषी तज्ज्ञ अभिजित खारगे यांचे मार्गदर्शन लाभले.
दीड ते दोन एकर ऊस आडसाली करूनसुद्धा एवढे उत्पन्न मिळत नाही. तेवढे उत्पन्न ६० दिवसांमध्ये कलिंगड पिकामध्ये मिळाले आहे. त्यामुळे युवकांनी कमी कालावधीत जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांची लागवड करावी, असे मत व्यक्त केले. - किरण जाधव, युवा शेतकरी
अधिक वाचा: Young Farmer Success Story सोळा वर्षाच्या प्रणवची डाळिंब शेती; काढतोय पाऊणकोटीचे उत्पन्न