Join us

Farmer Success Story: शेतकरी विठ्ठल कोळी करता आहेत एकरी पाच लाख उत्पन्नाची ऊस शेती वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 4:13 PM

कवठेएकंद (ता. तासगाव) येथे कामासाठी स्थायिक झालेले विठ्ठल शिवराम कोळी यांनी कष्टाच्या जोरावर अवघ्या अडीच एकरांमध्ये ऊस बियाण्यातून पाच लाखांचे उत्पन्न घेतले आहे.

प्रदीप पोतदारकवठेएकंद : कवठेएकंद (ता. तासगाव) येथे कामासाठी स्थायिक झालेले विठ्ठल शिवराम कोळी यांनी कष्टाच्या जोरावर अवघ्या अडीच एकरांमध्ये ऊस बियाण्यातून पाच लाखांचे उत्पन्न घेतले आहे.

संशोधन वृत्ती, कष्ट आणि प्रयोगशीलता अशा त्रिसूत्रीच्या जोरावर कोळी यांनी आळशी समजणाऱ्या ऊसशेतीत प्रयोगशीलतेमुळे उत्पन्नात वाढ केली आहे. साधारणतः ऊस बियाणे लागवडीतून एकरी पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

द्राक्ष शेती, ढबू मिरची, कलिंगडे, लसूण, कांदा, सोयाबीन, गहू, मका अशा वेगवेगळ्या शेती उत्पादनाबरोबरच ८००५, ८६०३२, २६५, ८०११ अशा पारंपरिक ऊस वाणांची लागवड ते करत होते. उच्चांकी उत्पादन व चांगल्या प्रतीचे उत्पादन घेण्यात त्यांचा हातखंडा आहे.

तरीही त्यांनी पारंपरिकतेला महत्त्व न देता वेगवेगळे प्रयोग शेतीत केले. यातूनच ते ऊस बियाणे निर्मितीकडे वळले आहेत. कवठे एकंदच्या माळरानावर लागवड केलेल्या नवीन ऊस बियाण्यांचे बेणे जिल्ह्यासह कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी ठिकाणांहून त्यांच्या ऊस बियाण्यास चांगली मागणी आहे.

महाराष्ट्रातील विविध साखर कारखान्यांनी शिफारस व मान्यता दिलेल्या ११०८२, १०००१, १८१२१ व १५०१२ अशा पी.डी.एन. पद्धतीच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्र आणि १३३७४ संकेश्वर संशोधन, केंद्राच्या ऊस व्हरायटीची लागवड केली.

वेगवेगळ्या जातीच्या ऊस बियाण्यांच्या माध्यमातून वर्षात एकरी पाच लाख रुपये उत्पन्न त्यांना मिळाले. विठ्ठल कोळी यांच्या प्रयोगशीलतेला शेतकरी बाळासो चिप्रीकर यांनी पाठबळ दिले आहे.

अशी द्या खताची मात्राऊस बियाण्यांची लागवड माळभागात असल्यास साधारणतः १५ ते २० दिवसांतून पाणी व्यवस्थापन करावे लागते. यासाठी पाठ पद्धत व ड्रीपचाही अवलंब होतो. पूर्व मशागतीसाठी दोन वेळा नांगरट, पालाकुट्टी, शेणखत, पेंड, गांडूळ खत अशा सेंद्रिय खतांवर भर दिला. युरिया, डीएपी, पोटॅश, मॅग्नेशियम, गंधक अशी रासायनिक खते गरजेनुसार वापरून बियाणे चांगले पोसवण्यासाठी मदत झाली असल्याचे कोळी यांनी सांगितले.

विठ्ठल कोळींनी असे केले प्रयोग● उसाचे १५०१२ पी.डी.एन. हे पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे वाण २६५ वाणाला क्रॉस आहे. चौदा महिने कार्यकाळ लागणारे हे वाण खारे पाणी किंवा कमी पाणी असणाऱ्या क्षेत्रात जास्त उत्पादन देते. यासाठी साखर कारखान्याकडून साखर उताऱ्यासाठीसुद्धा मान्यता आहे. या वाणाची महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश भागात लागवडीसाठी मागणी आहे. २५० रुपयेप्रमाणे प्रति मोळी बियाण्यासाठी दर मिळत आहे.● १८१२१ पी.डी.एन. हे वाण ८६०३२ ला क्रॉस असणारे व्हरायटीस चांगला साखर उतारा आहे. बारा महिने ते १३ महिने कार्यकाळ आहे. तर ११०८२ हे वाण ११ महिने कालावधीचे होते. प्रति मोळी दीडशे रुपये प्रमाणे दर मिळाला.● १३३७४ हे वाण संकेश्वर संशोधन केंद्र कोईमतूर, जि. मंडे येथून उपलब्ध केले होते. सुमारे १५ महिने कार्यकाळ असणाऱ्या २० गुंठे लागवड करून २०० रुपये प्रति मोळी प्रमाणे याचा दर मिळाला. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेशला याची मागणी जास्त आहे.

जमीन, पाण्याचा अभ्यास करून उसाचे वाण निवडा : विठ्ठल कोळीशेतकऱ्यांनी पाणी, जमिनीचा पोत या गोष्टींचा विचार करून ऊस बियाणे निवडावे. रोगांना बळी न पडणारे, चांगला साखर उतारा, जास्त वजन, चांगला फुटवा असणाऱ्या वाणातून चांगले उत्पन्न मिळते. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे. सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळले पाहिजे, असे मत विठ्ठल कोळी यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केले.

अधिक वाचा: Rose Farming Success Story: जगाच्या फुल मार्केटवर राज करतोय मावळचा गुलाब

टॅग्स :शेतकरीशेतीऊससांगलीपीकतासगाव-कवठेमहांकाळ