Join us

Farmer Success Story वैद्यकीय सेवेनंतर लाल मातीची सेवा, ड्रॅगनफ्रूटची यशस्वी शेती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 2:33 PM

डॉ. श्रीराम फडके यांनी वैद्यकीय सेवेतून निवृत्ती घेतल्यानंतर शेतीकडे लक्ष केंद्रित केले. आंबा, काजू, नारळ भात, नागली, भाजीपाला, कुळीथ, पावटा तसेच सिमला मिरचीचे उत्पन्न घेत आहेत.

मेहरून नाकाडेरत्नागिरी: आंबा, काजू अर्थार्जन मिळवून देणारी पिके असली तरी बेभरवशी हवामानामुळे पिकेही अनियमित झाली आहेत. उत्पादन खर्चही निघत नाही, शिवाय वन्यप्राण्यांमध्ये वानरे, माकडांमुळे होणारे नुकसान हे वेगळेच. यावर पूर्णगडच्या डॉ. श्रीराम फडके यांनी अभ्यास करून ड्रॅगन फ्रूट लागवडीचा पर्याय शोधला. त्यांचा हा पर्याय यशस्वी ठरला आहे.

ड्रॅगन फ्रूट ही निवडुंग प्रकारातील कणखर जात असून त्याला विशेष रोगराई नाही. शिवाय वानरांचा अजिबात त्रासही नाही. कमी पाण्यावर होणाऱ्या या उत्पादनासाठी सिमेंट पोल व त्याभोवती लावाव्या लागणाऱ्या रिंगा याचाच खर्च वाढतो.

परंतु, सरासरी शंभर रूपये किलो दराने विक्री होत असल्याने या फळामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची आर्थिक प्राप्ती होते हे डॉ. श्रीराम फडके व त्यांचे सुपुत्र डॉ. अनिरुद्ध फडके यांनी सिद्ध केले आहे. त्यांनी टप्प्याटप्प्यांनी एकूण २५०० ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे.

डॉ. श्रीराम फडके यांनी वैद्यकीय सेवेतून निवृत्ती घेतल्यानंतर शेतीकडे लक्ष केंद्रित केले. आंबा, काजू, नारळ भात, नागली, भाजीपाला, कुळीथ, पावटा तसेच सिमला मिरचीचे उत्पन्न घेत आहेत. सेंद्रीय पद्धतीने शेती करत आहेत. खर्चिक बनलेल्या आंबा पिकाला पर्याय म्हणून त्यांनी सुरुवातीला 'दोन एकर' क्षेत्रावर २०१६ झाली ६०० ड्रॅगन फ्रूटची लागवड केली.

लागवडीनंतर पहिल्या वर्षी त्यांना ८०० किलो उत्पन्न मिळाले, नंतर मात्र उत्पादन वाढत गेले. २०१९ साली त्यांनी पुन्हा १६०० झाडांची लागवड केली तर गतवर्षी ३०० नवीन व्हरायटीची रोपे लावली आहेत. दरवर्षी सात ते साडे सात टन उत्पन्न मिळेल असा त्यांचा विश्वास आहे.

'थायलंड रेड'ची लागवडडॉ. फडके यांनी तांबड्या रंगाच्या ड्रॅगन फ्रूटची २२०० झाडे लावली असून उत्पन्नही सुरू झाले आहे. गतवर्षी नवीन व्हरायटीची 'थायलंड रेड' या जातीची ३०० रोपे लावली आहेत. हे जम्बो आकाराचे फळ असणार असून, एक फळ एक किलो वजनाचे असेल. त्यामुळे दरही चांगला मिळेल, असा विश्वास डॉ. फडके यांनी व्यक्त केला.

पैसे मिळवून देणारे पीकड्रॅगन फ्रूट या पिकासाठी जास्त पाऊस व ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान चालत नाही. त्यामुळे हे पीक सहज कुठेही होऊ शकते. कळ्या आल्यानंतर महिना ते सव्वा महिन्यात फळ तयार होते. झाडाचे आयुर्मान २० ते २५ वर्ष असल्याने लागवडीनंतर फारसा त्रास शेतकऱ्याला होत नाही. मे महिन्यात आंबा काढून पूर्ण होतो. जूनमध्ये ड्रॅगन फ्रूटचा हंगाम सुरू होतो तो साधारणतः ऑक्टोबरपर्यंत चालतो. आंबा उत्पादनानंतर शेतकऱ्याला पैसे मिळवून देणारे पीक ठरले आहे. डॉ. फडके यांनी प्रयोग म्हणून सुरुवातीला लागवड कातळावर केली मात्र त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे

माझ्या वडिलांनी वैद्यकीय सेवेतील निवृत्तीनंतर शेतीमध्ये लक्ष केंद्रित केले. वडिलांमुळे माझ्यामध्येही शेतीची आवड निर्माण झाली. आंबा, काजू पिकाशी संलग्न उत्पन्न घेण्यासाठी वडिलांनी ड्रॅगन फ्रूट लागवडीचा निर्णय घेतला. पूर्ण अभ्यास करूनच लागवड केली. यशस्वी ठरल्यानंतर लागवड वाढविण्यात आली आहे. दरवर्षी प्रत्येक झाडाला शेणखत घालतो. ठिबक सिंचनद्वारे एका झाडाला पावसाळा संपल्यानंतर एक ते दीड लिटर पाणी देतो. रोगराईचा त्रास नसल्याने उत्पन्न चांगले येते. शिवाय आंबा/काजू हंगामानंतर ड्रॅगन फ्रूटचा हंगाम सुरू होतो. - डॉ. अनिरुद्ध फडके

अधिक वाचा: सोनं घडवणाऱ्या जयकर यांची कमाल; पारंपारिक पिकांना फाटा देत फुलवल्या देशी-विदेशी फळांचा बागा

टॅग्स :शेतकरीशेतीपीकफळेफलोत्पादनकोकणरत्नागिरीभातनाचणीआंबा