लक्ष्मण सोन्ने
देवगावफाटा : शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने अलीकडे शेतकरी बांधव शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय असल्याचा ओरड करतात. मात्र, सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथील एका युवा शेतकऱ्याने फुलशेतीतून प्रगती साधली आहे. दसऱ्यात एक लाखांचे उत्पन्न मिळवित फुलशेती यशस्वी करून दाखविली.
दरवर्षी परंपरिक शेतीतून मिळणारे अत्पन्न खर्च वजा करता हाती काहीच मिळत नसल्याने या शेतीला फाटा देत परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथील युवा शेतकरी अनंता मोरे हे फुलशेतीकडे वळले. बाजाराचा अंदाज घेऊन त्यांनी झेंडूची लागवड करण्याचा निर्णय घेतला. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी सणानिमित्त झेंडूच्या फुलांना मागणी असते. ही बाब लक्षात घेत अनंता मोरे यांनी झेंडू लागवड सुरू केली.
मागील पाच वर्षपासून योग्य नियोजन आणि बाजाराचा अंदाज घेऊन विक्रीतून आर्थिक उन्नती साधत आहेत. यंदाच्या दसरा कालावधीत त्यांनी एक लाखाचे उत्पादन मिळविले आहे. दिवाळीत यात आणखी वाढ होण्याची शक्यता मोरे यांनी व्यक्त केली. फुलशेतीतून होणारी प्रगती पाहून इतर शेतकरीही आता पारंपरिक शेतीबरोबर फुलशेतीकडे वळत असल्याचे मोरे म्हणाले.
इतर जिल्ह्यातील बाजारपेठेत विक्री
पाच वर्षांपासून सेलू, जिंतूर, मंठा आदी तालुक्यासह जालना जिल्ह्यातील बाजारपेठेत मोठी फेंडूच्या फुलांना मागणी असते. त्यामुळे परिसरात आता इतर शेतकरीही झेंडू लागवडीकडे वळत आहेत. यात अनंता मोरे, सर्जेराव मोरे, नारायण मोरे हे शेतकरीही प्रगती साधत आहेत.
विविधरंगी झेंडूची लागवड
सण उत्सवाच्या काळात फुलांना मोठी मागणी असते. त्या अनुषंगाने मोरे यांनी फुलशेती करताना विविधरंगी झेंडूंची निवड करून लागवड केली. प्रथमवर्षी राबविलेल्या प्रयोगात ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने विविध रंगी झेंडूंची फुले लागवडीवर भर दिला.
मागील काही दिवसांपूर्वी खराब वातावरणामुळे फुलाच्या शेतीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला. परिणामी फुलांचे बरेच नुकसान झाले. फुले खराब झाली आहेत. मात्र तरीही दसऱ्यामध्ये चांगले उत्पन्न मिळाले. आता दिवाळी फुलांना चांगला भाव मिळेल, असा अंदाज आहे. - अनंता मोरे, शेतकरी.