शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजना अनेकांना केवळ अनुदान घेण्या पलीकडे काहीही फायद्याच्या वाटत नाहीत. मात्र याच योजनेचा आधार घेत शिऊर (ता. वैजापूर) येथील गणेश यांनी आपल्या शेतीला प्रक्रिया उद्योगातून आर्थिक आधार दिला आहेत.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याच्या शिऊर येथील गणेश दादासाहेब जाधव यांना साडेसात एकर क्षेत्र आहे. ज्यात कांदा, मक्का, कपाशी, तूर, हरभरा इत्यादी पारंपारिक पिके घेतली जातात. पाण्याची कमतरता जाणवत असल्याने खरीप वगळता रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांत ठिबक, तुषार यांसारख्या सिंचन पद्धतींचा वापर करून पिके गणेश घेतात.
अनियंत्रित बाजारदर, घटलेले उत्पादन यात घरचा मुख्य उत्पन्न स्रोत केवळ शेती असल्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार करणे गणेश यांच्यासाठी कठीण होते. अशावेळी गावामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) सुरू झाली. ज्यात गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी चर्चा करून गणेश यांनी विचार केला की, शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड देणे योग्य ठरेल.
ज्यातून त्यांनी धान्य प्रतवारी केंद्र आणि डाळ मिल हा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी २५ बाय ५० फूट आकाराचे शेड उभारले आणि त्यात सुरू झाला धान्य प्रक्रिया उद्योग.
परिसरातील शेतकऱ्यांना होतोय फायदा
शिऊर येथील शेतकरी पूर्वी आपल्या शेतात मळणी यंत्राद्वारे धान्य काढून जसेच्या तसे जवळच्या बाजारात विक्रीसाठी नेत होते. मात्र, गणेश यांच्या धान्य प्रतवारी केंद्रामुळे आता शेतकरी त्यांच्या धान्याची प्रतवारी आणि स्वच्छता करून ते बाजारात विक्रीसाठी नेत आहेत. यामुळे बाजारात इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत प्रतवारी केलेल्या धान्याला अधिक दर मिळत आहे असे शेतकरी सांगतात. त्यामुळे गणेश यांच्या प्रतवारी केंद्राचा परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होतो आहे.
असे आहेत दर
गणेश यांच्या धान्य प्रतवारी केंद्रामध्ये धान्याची स्वच्छता आणि प्रतवारी करण्यासाठी शंभर रुपये प्रति क्विंटल दर आकारला जातो. तर डाळवर्गीय धान्यांची डाळ तयार करण्यासाठी आठ रुपये प्रति किलो असा दर आकारला जातो.
परिवाराची मिळते मोलाची मदत
धान्य प्रतवारी, डाळ मिल सोबत शेतीकामे आदींत गणेश यांना पत्नी अश्विनी, आई भामाबाई, वडील दादासाहेब यांची वेळोवेळी मोलाची साथ लाभत असल्याचे ते आवर्जून सांगतात.
थेट ग्राहकांशी व्यवहार करायचा ..
परिसरातील शेतकाऱ्यांकडे पिकणारे धान्य यांची प्रतवारी करून सोबत डाळ वर्गीय धान्यांची डाळ करून थेट ग्राहकांना विक्री करायची आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या जिवावर बाजार, व्यापारी आर्थिक सक्षम न होता शेतकारी समृद्ध होईल. - गणेश दादासाहेब जाधव.