धनंजय गावडे
शिक्रापूर : धामारी ता. शिरूर येथील छोट्याशा गावातील चंद्रकांत डफळ यांनी शिक्षण घेतल्या नंतर गेली अनेक वर्ष शेती मध्ये विविध प्रयोग करत चालू वर्षी बिट लागवड करत सहा एकर क्षेत्रातून तब्बल १७ लाख रुपये उत्पन्न मिळवले.
चंद्रकांत डफळ यांनी उच्च शिक्षण घेऊनही शेतीची आवड म्हणून शेती करण्याचा निर्णय घेतला. शेती करत असतांना शेपू , कोथिंबीर, मेथी हरभरा अशी अनेक पिके घेतली व भरघोस उत्पादन मिळवले होते.
कालांतराने मृदा व जलप्रदूषण समस्या गंभीर होत चालली असताना पीक पद्धतीत बदल करत नवनवीन प्रयोग सुरु केले. त्यात अल्पावधीत येणार पीक म्हणून लालिमा जातीचे बीट लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि सहा एकर मध्ये २०० ग्रॅमचे साठ डब्याची लागवड केली.
पाणी, हवामान आणि उष्णता याचा अभ्यास करून योग्य ती औषधे फवारणी केली व सहा ऐकर शेतीत तब्बल ७० टन इतके भरघोस उत्पन्न निघाले. लालीमा जातीचे बीट असल्यामुळे पुणे जिल्हा सह इतर राज्यातही त्याला मागणी वाढू लागली.
दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर मध्ये माल तयार झाल्यावर जिल्ह्यात मालाची असलेली मागणी पुरवठ्याचा तुटवडा बघता बीटच्या या वाणाला आजपर्यंतचा सर्वोच्च भाव म्हणजे प्रतिकिलो २४ रुपये ५० पैसे या भावाने मालविक्री जागेवर केली.
माताजी कृषी फार्म खडकी पिंपळगावचे प्रकल्प अधिकारी अक्षय कामठे यांनी जागेवरच येऊन बीट खरेदी केले. मालाची क्वालिटी चांगली असल्यामुळे पुणे सह इतर राज्यातही बीट विक्रीस पाठवले.
एक एकर क्षेत्रात साधारण २०० ग्रॅम चे दहा डबे लावले असता १२ टन माल निघेल असा अंदाज होता व यात यश मिळाले व साधारणपणे सहा एकर क्षेत्रात सुमारे १७ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.
साधारण खर्च हा चार लाख रुपये झाला असून निव्वळ नफा १३ लाख रुपये मिळाला असून अशा पद्धतीने सगळ्यांनी जर नियोजनबद्ध शेती केल्यास नक्की यश मिळेल, असा विश्वास असल्याचे डफळ यांनी व्यक्त केला.
याशिवाय शेतीच्या या पिकांच्या माध्यमातून अनेकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला केवळ शिक्षण घेऊन नोकरी करण्यापेक्षा शेतीतून विकास साधता येऊ शकतो, असा विश्वास असल्याचे डफळ यांनी सांगितले.
अधिक वाचा: Val Lagwad : वाल हमखास उत्पन्न देणारे किफायतशीर पीक कशी कराल लागवड