मेहरून नाकाडेश्रम, पैसा, वेळ यांची करण्यासाठी यांत्रिक अवजाराचे मूल्य अधिक आहे. रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथील सुनील सखाराम खापरे यांना हे मूल्य उमगल्यामुळे त्याचा सर्वाधिक वापर करत आहेत.
शासनाच्या विविध योजनांचा अवलंब करून बारमाही शेती करत आहेत. निव्वळ शेती नाही तर अधिकाधिक उत्पन्न मिळवण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच कृषी विभागातर्फे नुकतेच त्यांना प्रयोगशील शेतकरी म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
सुनील खापरे यांनी काही वर्षे सरपंचपदाची धुरा सांभाळली आहे. शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवताना स्वतःची आवडही जपली आहे. त्यामुळे गावात शेतीसाठी पहिल्यांदा पॉवरटिलर गावात आणला, तसा वापरही केला.
खरीप हंगामात दोन एकर क्षेत्रावर भात लागवड करत आहेत. भात काढल्यानंतर कुळीथ, हरभरा, भुईमूग, भाजीपाला लागवड करत आहेत. आंबा, काजू, नारळ बागायती लागवड केली आहे. शिवाय नारळावर काळी मिरीच्या वेली सोडून दुहेरी उत्पन्नसुद्धा घेत आहेत.
नारळ लागवडीकडे बागायतदारांचा वाढता कल असल्यामुळे नारळ रोपांना वाढती मागणी आहे. त्यामुळे सिंगापुरी वाणाची नारळाची रोपे तयार करून ती विक्री करत आहेत. खरीप हंगामात भात लागवडीबरोबर बांधावर तूर लागवड करतात.
शासनातर्फे तुरीचे बियाणे देण्यात आले होते, लागवड करून तुरीचे २०० किलो उत्पादन घेण्यात सुनील यशस्वी झाले आहेत. भात काढल्यानंतर जमिनीच्या ओलाव्यावर कुळीथ, हरभरा, भुईमूग, तर उन्हाळी हंगामात मुळा, माठ, मोहरी, वांगी, पावटा यासारख्या भाज्यांची लागवड करत आहेत.
यशस्वी हळद, आलं लागवडखरीप हंगामात दोन एकर क्षेत्रावर भात लागवड करतात. त्याशिवाय एक एकर क्षेत्रावर हळद लागवड करून यशस्वी उत्पादन घेत आहेत. दरवर्षी हळद नाही तर त्यामध्येही त्यांनी वैविध्य राखले आहे. एक वर्षी आलं लागवड करूनही चांगले उत्पादन घेण्यात त्यांना यश आले आहे. सुनील यांना त्यांच्या आजोबा, वडिलांकडून शेतीची प्रेरणा मिळाली, ती आवड जोपासत विविध पिके घेण्याकडे त्यांचा कल वाढत आहे. गावठी आलं, हळदीला चांगली मागणी आहे. शिवाय वन्यप्राण्यांचाही त्रास होत नसल्यामुळे थोड्याशा परिश्रमात चांगले उत्पादन मिळते हे सुनील यांनी सिद्ध केले आहे.
भाजीपाल्याचा खपउन्हाळी शेतीमध्ये मुळा, माठ, पालक, मोहरी, वांगी, मिरची या पिकांची लागवड सुनील करतात. खत, पाण्याच्या योग्य व्यवस्थापनामुळे पिकांचा दर्जाही उत्तम असल्याने शेताच्या बांधावरच विक्री होते. गावठी भाज्यांना वाढती मागणी आहे, शिवाय दरही चांगला मिळतो, हे सुनील यांनी बारमाही शेतीतून सिद्ध केले आहे.
कृषी विभागाकडून मूग, हरभरा, भुईमूग, तूर लागवडीसाठी बियाणे देण्यात आले होते. नावीन्यपूर्ण प्रयोग म्हणून मी लागवड केली; परंतु चांगले उत्पादन मिळाले. घराशेजारी ३५ नारळ लागवड केली आहे. प्रत्येक नारळावर काळीमिरीचे वेल सोडले आहेत. विशेष म्हणजे नारळाबरोबर काळीमिरीचे आंतरपीक चांगलेच येते, शिवाय या पिकासाठी विशेष कष्ट घेण्याची आवश्यकताही नाही. शेती करत असताना व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला व त्याला कष्ट, चिकाटीची जोड असेल तर यश नक्कीच मिळते. दरवर्षी नवनवीन प्रयोग करतो, त्यामध्ये मला यश्च आले आहे. - सुनील सखाराम खापरे