Join us

Farmer Success Story : कोरोनामध्ये नोकरी गेली मात्र शेतीनं तारलं आता शेतीच झाली नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 1:10 PM

कोरोनामध्ये नोकरी गेली म्हणून मुंबईला रामराम करून निगडे (ता. दापोली) येथील धोंडू गणपत रेवाळे यांनी गाव गाठले व शेतीवर लक्ष केंद्रित केले. सुरुवातीला खरीप हंगामात भात, नाचणी या दोन पिकांपुरती शेती मर्यादित होती.

मेहरुन नाकाडेरत्नागिरी : कोरोनामध्ये नोकरी गेली म्हणून मुंबईला रामराम करून निगडे (ता. दापोली) येथील धोंडू गणपत रेवाळे यांनी गाव गाठले व शेतीवर लक्ष केंद्रित केले. सुरुवातीला खरीप हंगामात भात, नाचणी या दोन पिकांपुरती शेती मर्यादित होती.

मात्र, पत्नी मनीषा हिच्या मदतीने पूर्णवेळ शेतीकडे लक्ष केंद्रित केले. सध्या ते बारमाही शेती करत असून शासनाच्या 'शेतकरी ते ग्राहक' थेट विक्री तंत्राचा अवलंब करून स्वतः दापोलीत स्टॉल लावून विक्री करत आहेत.

खरीप हंगामात भात, नाचणीचे पीक घेत असून, जोडीला वरी पिकासोबत चिबूड, काकडी, घोसाळी, शिराळी, कारळी, दुधी भोपळा, तोंडली, तांबडा भोपळ्यासह विविध प्रकारच्या पालेभाज्यांचे उत्पन्न घेत आहेत.

खरिपातील भात काढल्यानंतर रब्बी पिकांमध्ये पालेभाज्या, पावटा, वाल, कलिंगड, मिरची, टोमॅटो, राजमा, घेवडा, बटाटा, कोबी, वांगी, मिरची, कोथिंबीर, वालीच्या शेंगांची लागवड करून उत्पादन घेत आहेत.

नोकरीच्या काळात साठवलेल्या पैशातून जमीन विकत घेऊन बागायती लागवड केली. आंबा, काजू, सुपारीची लागवड केली आहे. योग्य मशागतीमुळे बागायतीचे उत्पन्न सुरू झाले आहे. दोन हजार काजू तर ८०० सुपारीची लागवड केली आहे.

दरवर्षी दीड, दोन टन काजू व दोन ते अडीच टन सुपारीचे उत्पन्न घेत आहेत. चांगला दर पाहून विक्री करत आहेत. सुधारित जातीमध्ये लाल भेंडी, सफेद कारली, भोपळा, काळा, लाल भात, पिवळ्या कलिंगडाची लागवड करतात.

पती, पत्नी सतत शेतात राबत असतात. मुलांचेही शेतीच्या कामात सहकार्य मिळत असल्याचे रेवाळे यांनी सांगितले. लाल मातीत ते विविध पिकांचे उत्पन्न घेत आहेत.

कलिंगड उत्पादनअगस्ता, अनमोल, नामधारी या सारख्या कलिंगड वाणांची निवड लागवडीसाठी करत आहेत. आतून पिवळे बाहेरून हिरवे, बाहेरून पिवळे व आतूनही पिवळे, बाहेरून पिवळे व आतून लाल या प्रकारच्या वाणाची निवड लागवडीसाठी करत आहेत. एक एकर क्षेत्रावर ते कलिंगड लागवड करीत असून सात ते आठ टन उत्पादन घेतात. विविध प्रकारच्या कलिंगडांना ग्राहकांकडून चांगली मागणी असून स्वतः स्टॉलवरच विक्री करतात

सुपारी, काजूचे उत्पादन काजूची दोन हजार तर सुपारीची ८०० रोपे लावली असून काजू, सुपारीचे उत्पादन सुरू झाले आहे. व्यापारी दारावर खरेदीसाठी येतात. चांगला दर पाहून आपण विक्री करीत असल्याचे रेवाळे यांनी सांगितले. अर्धा एकर क्षेत्रावर भात लागवड करत असून लाल, काळा, वाडा कोलम, जया, अंकुर या वाणांची लागवड केली आहे. आरोग्यदृष्ट्या काळा, लाल तांदळाचे महत्त्व असून, चांगला दर मिळत असल्याचे रेवाळे यांनी सांगितले.

कोरोना काळात नोकरी गेल्यावर गावी आलो. सुरुवातीला पावसाच्या पाण्यावर भात, नाचणी हीच पिके घेत होतो. मात्र काही कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करण्याचे निश्चित केले. काही सुधारित वाणांची निवड केली. योग्य खत, पाणी व्यवस्थापनामुळे चांगले उत्पन्न मिळत आहे. सेंद्रिय खते, जीवामृताचा वापर करत असून दर्जा व उत्पादन उत्कृष्ट राखण्यात यश आले आहे. योग्य नियोजन करून लागवड करत असल्यामुळे दररोज स्टॉल लावून भाज्यांची विक्री करतो. स्टॉलवर येण्यापूर्वीच ग्राहक आधी येऊन वाट पाहत असतात. स्वतः विक्री करत असल्याने ग्राहकांची मागणी, प्रतिसाद, प्रतिक्रियासुद्धा समजते. -धोंडू गणपत रेवाळे, निगडी, ता. दापोली

टॅग्स :शेतीशेतकरीपीकरत्नागिरीभाज्याकोरोना वायरस बातम्यानोकरीखरीपभात