मेहरून नाकाडे
रत्नागिरी : तालुक्यातील सोमेश्वर येथील विनायक बाळकृष्ण केळकर यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर वडिलोपार्जित शेतीमध्ये लक्ष केंद्रित केले. केवळ शेती नाही तर दुग्धोत्पादन व प्रक्रिया उद्योगाची जोड दिली आहे. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेती केली तर ती परवडते, हे विनायक केळकर व त्यांच्या कुटुंबीयांनी सिद्ध केले आहे.
विनायक केळकर यांनी आठ एकर क्षेत्रात बागायत फुलवली आहे. १५० आंबा, ४०० काजू, ३० नारळ, ३०० सुपारीची लागवड केली आहे. नारळी व सुपारीवर त्यांनी २०० काळीमिरीची कलमे लावली आहेत. खरीप हंगामात २५ गुंठे क्षेत्रावर भात लागवड करीत आहेत. शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्धोत्पादन व्यवसाय सुरू केला आहे.
त्यांच्याकडे पाच म्हशी असून, दिवसाला २५ लिटर दुधाची विक्री करतात. शेतीच्या कामाला विनायक यांची पत्नी मधुरा व वहिनी जान्हवी यांचे सहकार्य मिळत आहे. शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे.
त्यामध्ये विविध प्रकारची लोणची, पिठे, सांडगी मिरची, आंबा, फणसपोळी, कोकम तयार करून विक्री करतात. 'थेट विक्री'वर विशेष भर असून, कृषितज्ज्ञ संदीप डोंगरे यांचे त्यांना मार्गदर्शन मिळत आहे.
शेतकरी ते ग्राहक' थेट विक्रीवर भर
विनायक यांना शेतीची आवड असल्यामुळेच बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते शेतीकडे वळले. आंबा, काजू, नारळ, सुपारी तसेच आंतरपीक म्हणून काळीमिरी उत्पादन घेत आहे. ओले काजूगर काढून विक्री करतात. शिवाय वाळलेली काजू बी चांगला दर पाहून विक्री करतात. खरीप हंगामात भातासह भाजीपाला उत्पादन घेत आहे. शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू केला असून, उत्पादित मालाची ते स्वतः विक्रेत्यांशी संपर्क साधून विक्री करत आहेत. त्यामुळे दरही चांगला मिळत आहे. घरगुती उत्पादनांचा दर्जा उत्तम असल्याने ग्राहकांकडन हातोहात खरेदी होत आहे.
खत, पाणी व्यवस्थापन
पेरणीसाठी बियाणे निवड, खत ते पाणी व्यवस्थापनावर विनायक स्वतः लक्ष केंद्रित करतात. ग्राहकांशी थेट संपर्क साधून दर ठरवितात. त्यामुळे शेतमाल उत्पादनाची विक्री सुलभ झाली आहे. शिवाय दूध विक्री चांगली होत असल्याचे सांगितले.
सेंद्रिय खतनिर्मिती
बागायतीतील पालापाचोळा, म्हशीचे शेण एकत्रित करून कंपोस्ट खतनिर्मिती करत आहेत. बागायती व शेतीसाठी त्याचा वापर करत आहेत. सेंद्रिय शेतीवर विनायक यांचा भर आहे. रासायनिक खते, कीटकनाशकांचा मर्यादित वापर करत असून, उत्पादनाचा दर्जा उत्तम राखण्यात यश आले असल्याचे विनायक यांनी सांगितले.
ग्राहकांकडून सेंद्रिय उत्पादनांना वाढती मागणी आहे. हाच दृष्टिकोन ठेवून शेती करत आहे. आंबा, काजू, नारळ, सुपारी विक्रीसाठी सुरुवातीला प्रयत्न करावे लागले. मात्र आता ग्राहक स्वतःहून संपर्क साधत आहेत. गृहोद्योगातून विविध प्रकारची पिठे, लोणची, सांडगी मिरची, आंबा, फळस पोळी, कोकम तयार करून विकतो. ओली व वाळवलेल्या काळीमिरीला चांगली मागणी आहे. बागायती व शेतीमुळे म्हशींना बारमाही ओला चारा उपलब्ध होत असल्याने दुग्धोत्पादनही चांगले आहे. शेती व उद्योग व्यवसायात पत्नी व वहिनीची भक्कम साथ मिळत आहे. - विनायक केळकर
अधिक वाचा: Young Farmer Success Story आष्ट्याच्या अमोलने केली भाजीपाल्याची शेती; टोमॅटोतून झाला लखपती