नाशिक जिल्ह्यातील खर्डे (ता. देवळा) येथील प्रगतिशील शेतकरी कृष्णा जाधव यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक एकर क्षेत्रावर सिमला मिरचीची लागवड केली आहे. यातून जाधव यांना कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
जाधव यांनी आपल्या एक एकर क्षेत्रावर कृषी विभागाकडून अनुदान तत्त्वावर शेडनेटची उभारणी केली आहे. यात त्यांनी पयलेडीयन कंपनीच्या सिमला मिरचीचे १० हजार रोपांची लागवड ९ ऑगस्ट रोजी केली असून यासाठी त्यांना २ लाख रुपयांच्या आसपास खर्च आला आहे. आतापर्यंत यात सिमला मिरचीचे जवळपास ६ टन उत्पन्न निघाले असून मिरचीला बाजारात चांगली मागणी असल्याने प्रतिकिलो ५०,५५ रुपये भाव मिळत आहे. अवघ्या चार महिन्यात जाधव
यांना ३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. खर्डे येथील प्रगतशील शेतकरी कृष्णा जाधव यांच्याकडे जेमतेम क्षेत्र असून, ते आपल्या शेतात आधुनिक पद्धतीने नवनवीन प्रयोग करून कमी खर्चात भरघोस उत्पन्न घेत आहेत.
जागेवरच मिळतेय पैसे...
गेल्या चार महिन्यांपूर्वी त्यांनी कृषी विभागाकडून शेडनेटची उभारणी करून, त्यात शिमला मिरचीची लागवड केली आहे. या उत्तम प्रीतीच्या मिरचीला बाजारात सध्या चांगली मागणी असल्याने व्यापारी घरपोच येऊन माल घेऊन जात असून जागेवरच पैसेदेखील मिळत असल्याचे जाधव सांगतात.