Join us

Zucchini Farming Success Story : अवघ्या ६० दिवसात या पिकातून केली बंपर कमाई वाचा सुनील पाटलांची यशदायी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 10:32 AM

ऊस शेतीला फाटा देऊन वेगळा प्रयोग करण्याचे ठरवले. झेंडू, निशिगंध या फुलांच्या सोबतच झुकिनीची Zucchini Plant लागवड केली. याला मुंबई बाजारपेठेत चांगली मागणी आहे. उसापेक्षा फुले आणि भाजीपाला लागवड निश्चित फायदेशीर आहे.

सुरेंद्र शिराळकरआष्टा परिसरातील युवा शेतकरी नेहमीच शेतीच्या वेगवेगळ्या प्रयोगात यशस्वी होताना दिसत आहेत. असाच काहीसा प्रयोग येथील प्रगतशील शेतकरी सुनील पाटील यांनी करत अवघ्या ६० दिवसात चायनीज झुकिनी या पिकातून लाखो रुपयांची कमाई करीत शेतीत नैराश्य पत्करणाऱ्यांना आशेचा किरण दाखवला आहे.

तीस गुंठ्यांमध्ये दोन लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे. सुनील पाटील हे एका पतसंस्थेचे व्यवस्थापक आहेत. संस्थेचे काम करीत असतानाच उसासह इतर पिकांना फाटा देऊन वेगळे काहीतरी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

त्यांनी शेतीची उभी आणि आडवी नांगरट करून शेणखत पसरले. साडेचार फुटावर बेड तयार करून मल्चिंग पेपर अंथरले. विहिरीचे पाणी ठिबकच्या साह्याने दिले. तत्पूर्वी बेसल डोस देऊन सुमारे अडीच फुटावर झुकिनीचे बियाणे ऑगस्टमध्ये टोकले.

वेळोवेळी ठिबकच्या साह्याने पाणी आणि दिवस आड रासायनिक खते ठिबकमधून दिली. लागवडीनंतर ३५ ते ४० दिवसानंतर झुकिनीची फळे सुरु झाली. ही फळे मुंबई येथील दादर मार्केटमध्ये तसेच पुणे, हैदराबाद, गोवा या ठिकाणी असलेल्या बाजारपेठेत पाठवण्यात येत आहेत.

हिरवी व पिवळी झुकिनीची काकडीप्रमाणे सलाड किंवा कोशिंबीरसाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हिरव्या झुकिनीला दहा रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. ३० गुंठ्यात सुमारे ५० किलो ते ३०० किलोपर्यंत उत्पादन मिळते.

३० गुंठ्यात सरासरी सहा ते सात टन उत्पन्न मिळते. सरासरी २५ ते ३० रुपये दर मिळत असल्याने याचे दोन लाखांपर्यंत उत्पादन मिळणार आहे. दोन ते अडीच महिन्यात ७० ते ८० हजार रुपये खर्च वजा जाता एकरी सव्वा लाख रुपयांचे उत्पादन मिळते.

डिग्रज येथील अभिजीत पाटील, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. तसेच कुटुंबाचीही साथ मिळाली, असेही सुनील पाटील यानी सांगितले. 

ऊस शेतीला फाटा देऊन वेगळा प्रयोग करण्याचे ठरवले. झेंडू, निशिगंध या फुलांच्या सोबतच झुकिनीची लागवड केली. याला मुंबई बाजारपेठेत चांगली मागणी आहे. उसापेक्षा फुले आणि भाजीपाला लागवड निश्चित फायदेशीर आहे. - सुनील पाटील, शेतकरी

टॅग्स :शेतकरीशेतीपीकभाज्याऊसठिबक सिंचनपीक व्यवस्थापन