फकिरा देशमुख
भोकरदन तालुक्यातील खंडाळा येथील सोनवणे कुटुंबाने पारंपरिक पिकांना फाटा देऊन तब्बल १६ एकरांत प्रायोगिक तत्त्वावर बटाटा पिकाची लागवड (Potato Crop Cultivation) केली. त्यातून त्यांनी ७० दिवसांत २८ लाख ५० हजारांची १ हजार ७५० क्विंटल उत्पादन काढून बटट्याचा यशस्वी प्रयोग करून दाखवला.
खंडाळा येथील विलास शेषराव सोनवणे हे शिक्षक आहेत, तर लहान भाऊ दामोदर शेषराव सोनवणे, आई कुशीवर्ताबाई सोनवणे, पत्नी सविता विलास सोनवणे, भावजय मनीषा दामोदर सोनवणे यांची गट नंबर २१५ मध्ये २० एकर शेती आहे.
त्यापैकी १६ एकरांत पुणे येथून पुखराज जातीचे १६० क्विंटल ३ हजार प्रतिक्विंटल भावाने बेणे आणले. त्याची ३ नोव्हेंबर रोजी टॅक्टरद्वारे चार बाय सहा इंच अंतरावर लागवड केली होती. त्यानंतर ठिबकद्वारे पाणी व खताचे व्यवस्थापन केले. शिवाय, चारवेळा बुरशीनाशकांची फवारणी केली होती.
त्यासाठी एकूण ८ लाख खर्च आला. २४ जानेवारीपासून हार्वेस्टिंग सुरू असून, आठ एकरांत आतापर्यंत ९०० क्विंटल उत्पादन निघाले आहे. त्याला १६०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. दोन दिवसांत पूर्ण बटाटे काढणार असल्याचे विलास सोनवणे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीला प्राधान्य द्यावे
सोळा एकरात एकूण १७५० क्विंटल उत्पादन निघणार आहे. हे बटाटे जळगाव मार्केटमध्ये विक्रीसाठी नेण्यात येत आहे. यातून २० लाखांचे उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक शेती करण्यावर भर दिला पाहिजे. तेव्हाच शेतकऱ्यांची प्रगती होईल.
मिरची घावली अन् कर्जमुक्त झालो
* शेतात दोन एकरमध्ये शेततळे, दोन एकरांत शेडनेट आहे. यावर करपा रोग येतो. त्यासाठी खताचा मारा केला जातो. यात सोलोबल खत, बुरशीनाशकांच्या चार फवारणी व पोट्याश युक्त खते द्यावे लागते. त्यासाठी आठ लाख ५० हजार खर्च आला असून, २० लाखांचा नफा झाला.
* यासाठी मध्य प्रदेशातून ७० मजूर आणले होते. त्यांच्या राहण्याची सोयही केली होती. फेब्रुवारीनंतर मजूर जातात व जुलैमध्ये पुन्हा कामासाठी येतात. ३ वर्षापूर्वी तोटा आला. त्यामुळे २२ लाखांचे कर्ज झाले होते. मात्र, त्यानंतर २०२३ मध्ये ६७ लाखांची मिरची झाली आणि कर्जमुक्त झालो.
बटाट्याचे गुपीत
* १६ एकरात बटाट्याची लागवड करत २८ लाखांचे उत्पादन
* खंडाळा येथील शेतकऱ्याने २८ लाखांचे उत्पन्न मिळविले. सध्या जमिनीतून बटाटे काढले जात आहे.
* ८ लाख रुपयांचा खर्च आला आहे. औषधी फवारणी, सोलोबल खत, बुरशीनाशकांच्या फवारणी आणि पोट्याश युक्त खते द्यावे लागते.
पहिल्यांदाच लागवड
मिरचीतून ७० लाख मिळाले. त्यासाठी ३० लाख खर्च आला. मिरची खराब झाल्यानंतर १६ एकरांत एकरी १० क्विंटल बटाटे लावले. त्यात एकरी ११० क्विंटल उत्पादन झाले. बटाटे पहिल्यांदाच लावले आहे. - विलास सोनवणे, उत्पादक शेतकरी.