दिलीप कुंभार
नरवाड: नरवाड (ता. मिरज) येथील सचिन आण्णासाहेब कुंभार या उपक्रमशील शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देऊन बेबी कॉर्न मक्याची लागवड करून त्यांनी अवघ्या तीन महिन्यांत एक एकरात ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले.
बेबी कॉर्न मक्यापासून चांगले उत्पन्न काढून शेती क्षेत्रात करिअर करणाऱ्यांसाठी सचिन कुंभार यांनी आदर्श निर्माण केला आहे. बेबी कॉर्न मक्याची लागवड कुठल्याही हंगामात करता येते. हे तीन महिन्यांत भरघोस उत्पादन देणारे नगदी पीक असून यासाठी लागणारा खर्चही कमी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
बेबी कॉर्न मका काळ्या कसदार जमिनीत जोमाने येतो. तर हलक्या जमिनीत याचे उत्पादन अपेक्षित येत नाही. जिद्द व चिकाटीच्या जोरावर सचिन यांनी बेबी कॉर्नची लागवड करून यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला.
यामुळे पाण्याची व मजुरांची बचत झाली. बेबी कॉर्नचे बियाणे बेबी कॉर्न खरेदी करणाऱ्या कंपन्या एक किलोस ६५० रुपये किलो दराने पुरवितात. एकरी ६ ते ७ किलो बियाणे यासाठी लागते. बेबी कॉर्नला लष्करी अळीचा धोका असल्याने यावर प्रतिबंधात्मक कीटकनाशकांची वेळेत फवारणी केली जाते. याशिवाय युरिया खताची मात्रा दोन वेळा दिली जाते.
बेबी कॉर्न मक्याला तुरा आला की कणसे काढली जातात. लागवडीपासून ६० ते ६५ दिवसांनंतर कणसे तयार होतात. एका बेबी कॉर्नच्या ताटाला किमान दोन कणसे लागतात. ही कणसे मोठमोठ्या हॉटेलमध्ये व शाकाहारात गिरवी बनविण्यासाठी वापरली जातात.
साधारणतः कणसाचे आकारमान एक इंच जाडीचे झाल्यावर कणसे काढली जातात. ही कणसे विविध कंपन्यांचे प्रतिनिधी जागेवर येऊन घेऊन जातात. जागेवर बेबी कॉर्न मक्याला ८ रुपये किलो दराने खरेदी केली जाते. या कंपन्या ही कणसे सोलून पॅकिंग करून याची निर्यात करतात. मिरज तालुक्यातील आरग येथे या कंपन्या कार्यरत आहेत.
मक्याची लागवड फायदेशीर
बेबी कॉर्न मक्याची कणसे एक आड दिवस पद्धतीने ५ ते ६ तोडे काढले जातात. दरम्यानच्या काळात मक्याला पाणी भरपूर द्यावे लागते. यानंतर या बेबी कॉर्न मक्याचा गुरांना चारा म्हणून चांगला फायदा होतो. या चाऱ्यापासून दुधाळ जनावरांचे दूध वाढून गुरांची तब्येत सुधारली जाते. अशा या बहुगुणी मक्याची लागवड शेतकऱ्यांनी करून आपले राहणीमान उंचावावे, असा सल्ला सचिन कुंभार यांनी दिला.