बी. एस. देवनाळे
आधुनिक पद्धतीने आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून शेती केल्यास ती निश्चितच फलदायी ठरते. याची अनुभूती लातूर अहमदपूर तालुक्यातील मोहगाव येथील एका शेतकऱ्याने घेतली आहे. अवघ्या तीन महिन्यांत त्यांनी झेंडूचे पीक आणि पत्ताकोबीच्या आंतरपिकांतून सहा लाखांचे उत्पन्न घेतले आहे. या पिकांनी त्यांना लखोपतीच बनविले आहे.
शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय म्हणून पाहिले जाते. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती पिकांना फटका बसतो. परिणामी, लागवडीसाठी केलेला खर्चही पदरी पडत नाही. त्यामुळे नवीन युवक शेती करण्यास धजावत नाहीत. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत नवनवीन प्रयोग केल्यास शेती लाभदायक ठरते. त्यातून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारते, याचा अनुभव अहमदपूर तालुक्यातील मोहगाव येथील शेतकरी सुग्रीव शिरसाट यांना आला आहे.
मोहगाव येथील अल्पभूधारक शेतकरी सुग्रीव शिरसाठ यांचे शिक्षण एमए, बीएडपर्यंत पूर्ण झाले आहे. नोकरीच्या मागे न लागता त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा संकल्प केला. त्यानुसार त्यांनी आपल्या एक एकर शेतीत ऑगस्टमध्ये झेंडूच्या पाच हजार रोपांची चार बाय अडीच फूट अंतरावर लागवड केली.
त्यात आंतरपीक म्हणून गोबीची रोपे लावली, वेळेवेळी खत, फवारणी केल्याने दोन्ही पिके चांगली बहरली. झेंडूच्या एका रोपासाठी त्यांना साडेतीन रुपये आणि इतर ५० हजारांचा खर्च झाला, तसेच गोबी पिकासाठी ५० हजारांचा खर्च झाला.
दसरा सणानिमित्ताने आणि आता दीपावली सणानिमित्ताने त्यांनी झेंडूच्या फुलांची तोडणी सुरू केली आहे. सध्या बाजारात झेंडूच्या फुलांना शंभर ते दीडशे रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. साधारणतः १५ ते २० क्विंटल झेंडू उत्पन्न अपेक्षित आहे. तसेच गोबीला सरासरी १५ ते २० रुपये किलो भाव आहे. गोबी जवळपास २०० क्विंटल निघेल, अशी आशा आहे.
झेंडूच्या फुलांना दीडशेपर्यंत भाव...
■ यंदा वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांना लाभ झाला आहे. यंदा झेंडूच्या फुलांचे उत्पादन कमी झाले आहे. त्या तुलनेत मागणी अधिक आहे. त्यामुळे बाजारपेठेत झेंडूच्या फुलांना अधिक भाव मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे.
■ मोहगाव येथील शेतकरी सुग्रीव शिरसाठ यांनी शेतीचे योग्य नियोजन करुन उत्पादन घेतले आहे. त्यामुळे पीक चांगले बहरले. केशरी आणि पिवळ्ळ्या धमक झेंडूच्या फुलांनी सोन्यासारखे उत्पन्न दिले असल्याचे शेतकरी सुग्रीव शिरसाठ यांनी सांगितले.
नवनवीन प्रयोग करावेत
शेतकऱ्यांनी बांधावर उभे राहून शेती न करता प्रत्यक्ष अनुभवातून आधुनिक पद्धतीने शेती केल्यास अधिक उत्पन्न देते. शेतीत सतत नवनवीन प्रयोग केले पाहिजे. शिवाय, खर्च कमी करुन अधिकाधिक उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. - सुग्रीव शिरसाठ, शेतकरी.