बालाजी आडसूळ
कल्पकता, त्यातून निर्माण होणारी स्वप्न अन् ती पूर्णत्वात नेण्यासाठी कष्ट करण्याची तयारी अंगी असली की हमखास यश पदरात पडते. धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील अमोल राखुंडे या अभियंता असलेल्या तरुणाने काळ्या आईच्या कुशीत फुलविलेली शेवंती हे याचे एक बोलके उदाहरण.
कळंब येथील अमोल विजय राखुंडे या तरुणाची लगतच्या डिकसळ शिवारात शेती आहे. जमिनीची प्रत तशी मध्यम अशीच. मात्र, या क्षेत्रातच 'सिव्हिल इंजिनीअर' असलेल्या या तरुणाने फुलशेती यशस्वीरीत्या फुलवून यशाचे 'इमले' बांधल्याचे दिसून येत आहे.
अमोल यांनी मागच्या तीन वर्षांपासून आपल्या शेतीला कृषी प्रयोगशाळा समजून विविध पिकांची यशस्वी उत्पादने घेतली आहेत. यातही नाजूक समजल्या जाणाऱ्या फुलशेतीत आपला हातखंडा निर्माण केला आहे. दोन वर्षांपूर्वी बिजली फुलांचा प्लॉट यशस्वी केल्यानंतर यंदा 'शेवंती' फुलशेती यशस्वी केली आहे.
आज अमोल राखुंडे यांच्या तीन एकर क्षेत्रातील शुभ्र अशा फुलांची तोड सुरू झाली असून, आजतागायत १२ टन वजनाचे चार तोडे विक्री झाले आहेत. यापुढील काळात वातावरण अनुकूल राहिले तर महिनाभर अमोल यांच्या शेतातील शेवंती लाखांवर रुपये हाती देणार आहे.
... शेवंती फुलशेतीची काय आहेत वैशिष्ट्ये
■ रंग विविधता, आकार, मोहकता आदी नैसर्गिक देणगीमुळे शेवंतीला 'फुलांची राणी' संबोधले जाते.
■ अहिल्यानगर येथे सर्वाधिक, याशिवाय पुणे, सोलापूर, सांगली, सातारा भागात अधिक लागवड होते.
■ शेवंतीच्या हजारो जाती असून, आपल्याकडे शुभ्र, लाल, जांभळा अशा रंगावरून वाण निवडतात.
■ मावा, फुलकिडे, लाल कोळी, अस्वली अळी या किडींचा तसेच मर, पानांवरील ठिपके रोगांचा प्रादुर्भाव दिसतो.
■ उगवण ते वाढीच्या काळात दिवस मोठा तर फुल बहराच्या काळात दिवस लहान असल्यास चांगले राहते.
■ लग्नसराई, सणवार, देवींचे हार यासाठी मागणी.
■ हैदराबाद, मुंबई, पुणे येथील मुख्य मार्केट शेवंतीला भाव देते.
अशी केली पूर्व मशागत...
तीन एकर क्षेत्रात मे महिन्याच्या प्रारंभी नांगरट करून घेतली. यानंतर १५ ट्रॉली शेणखत टाकले, मोगडणी करून घेतली. त्यानंतर पाच फुटांची सरी काढून ठिबक संच जोडणीचे नियोजन करून घेतले.
लागवड पश्चात नियोजन...
प्रथम बांगडी पद्धतीने बुडाला भेसळ डोस दिला. तदनंतर पाच दिवसाआड मिश्र व विद्राव्य खतांची ६० दिवसांपर्यंत व पुढे याच पद्धतीने १३:४०:१३ तसेच ५२:३४ खतांची मात्रा दिली. कळी खुलणे, फुलफूट टाळणे याबरोबरच अळींची काळजी घेतली.
२८ हजार रोपांची लागवड...
दिनांक १५ मे रोजी लागवड सुरू केली. यासाठी पुणे येथून २ रुपये ९० पैसे जागेवर या दराने आणलेली पांढरी शेवंती रोपे पाच बाय सव्वाफूट या आकारात लावली. तीन एकरांत एकूण २८ हजार रोपांची लागवड झाली.
असे होते पाणी नियोजन...
शेवंती पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. पहिले दीड महिना दररोज १० मिनिटे व तदनंतर दररोज अर्धा तास पाणी दिले. मावा, अळी, करपा प्रतिबंधक फवारण्या करून घेण्याची काळजी घेतली.
शेवंती फुलली, हैदराबादेत पोहोचली...
अमोल राखुंडेंनी फुलवलेल्या शेवंतीचा १३० दिवसांनी हाती आलेला चार टनाचा पहिला तोडा हैदराबादेत पोहोचला. दीडशेच्या दराने पाच लाखांवर रक्कम देऊन गेला. पुढे तीन तोड्यांत आठ टन माल हाती आला. एकरी दोनेक लाख खर्च झाला; परंतु, प्लॉट नफ्यात राहिला, असे इंजिनीअर अमोल विजय राखुंडे यांनी सांगितले.