Join us

Farmer Success Story : भरत व भक्ती यांचा बारमाही भाजीपाला शेतीचा यशस्वी पॅटर्न वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 3:09 PM

आईने भाजीपाला विक्री करून एकुलत्या एक मुलाचे संगोपन केले. आईकडून ही प्रेरणा घेत दापोली तालुक्यातील कुडावळे येथील भरत पेवेकर यांनी शेतीमध्ये लक्ष केंद्रीत केले.

मेहरून नाकाडेरत्नागिरी : आईने भाजीपाला विक्री करून एकुलत्या एक मुलाचे संगोपन केले. आईकडून ही प्रेरणा घेत दापोली तालुक्यातील कुडावळे येथील भरत पेवेकर यांनी शेतीमध्ये लक्ष केंद्रीत केले.

बारमाही भाजीपाला उत्पादन करून स्वतःच विक्री करत आहेत. लग्नानंतर पत्नी भक्ती यांचीही भक्कम साथ त्यांना मिळाली असून, पेवेकर दाम्पत्याने शेतीचा विस्तार केला आहे.

भरत यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पूर्णवेळ शेतीमध्ये लक्ष केंद्रित केले. २००२ पासून ते शेती करत आहेत. खरीप हंगामात अर्धा एकर क्षेत्रावर नाचणी लागवड करतात. उर्वरित ५ ते ६ एकर क्षेत्रांवर विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करतात.

विशेष म्हणजे दोन एकर क्षेत्रांवर ते चिबूड लागवड करीत असून, दापोली बाजारपेठेत स्वतःच त्याची विक्री करतात. चिबूड उत्पादनातून चांगला पैसा मिळतो, असे भरत यांनी सांगितले.

भेंडी, काकडी, दोडकी, पडवळ, तोंडली, कारली, घोसाळी, लाल भोपळा, दुधी भोपळा, भेंडी, वालीच्या शेंगा, पालेभाज्यांमध्ये मुळा, माठ, मेथी, तसेच कंदमुळामध्ये काटेकणंगाची लागवड करून उत्पादन घेत आहेत.

एका वेळी स्टॉलवर एकाच प्रकारची भाजी विक्रीसाठी न नेता पाच ते सहा प्रकारच्या भाज्या विक्रीसाठी नेल्या, तर ग्राहकांनाही एकाच ठिकाणी भाज्या उपलब्ध होतात. ताज्या, दर्जेदार भाज्यांमुळे विक्रीसुद्धा हातोहात होत असते.

रब्बी हंगामात मिरची, टोमॅटो, वांगी, कोबी, पडवळ, काकडी, दोडकी, कारली, घेवडा लागवड करतात. याशिवाय एक एकर क्षेत्रावर कलिंगड लागवड करत आहेत. नैसर्गिक शेती करत असल्यामुळे ते सेंद्रीय खते, जीवामृताचा वापर करत आहेत.

बागायती लागवडभरत पेवेकर यांची स्वतःची जमीन कमी असल्यामुळे जमीन भाड्याने घेऊन लागवड करतात. भाजीपाला उत्पादनाने त्यांना तारले असून, त्यांचे कष्ट फळाला आले आहेत. त्यांनी ६९ गुंठे जमीन विकत घेऊन त्यावर २२० काजूची लागवड केली आहे. पाण्यासाठी विहीर खोदली असून, सौर कृषी पॅनल बसवून बागायतीला पाणी देत आहेत. भरत व त्यांची पत्नी स्वतः शेतीच्या कामासाठी राबत असतात. कष्टातून बागायती फुलविली आहे.

दररोज विक्रीवर भरताज्या भाज्यांना मागणी अधिक असते. स्टॉलवर एकापेक्षा अधिक भाज्या लागवडीला आणता येईल, याचे नियोजन करून ते शेतात भाज्यांची लागवड करतात. भरत यांचे मामा एकनाथ मोरे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभत असून, विक्रीचे तंत्रही त्यांनी शिकविले आहे. दापोली, मंडणगड व आसपासच्या गावातून जाऊन पेवेकर दाम्पत्य भाजीपाला विक्री करतात. सेंद्रीय खतामुळे दर्जा चांगला असल्याने हातोहात विक्री होते.

आईने भाजीपाला विकून माझे संगोपन केले. त्यामुळे बारावीनंतर शिक्षण थांबवून नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचे निश्चित केले. मामा एकनाथ मोरे यांनीही मला प्रोत्साहन दिले. खरीप हंगामात भात लागवड न करता नाचणीसह विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करतो. खरिपानंतर रब्बी व उन्हाळी हंगामातही भाज्यांचे उत्पादन घेत आहे. विक्रीसाठी माझ्याबरोबर पत्नीसुद्धा स्टॉल सांभाळते. थेट विक्रीचा फायदा होतो. कमीत कमी जागेत जास्तीत जास्त व दर्जेदार उत्पन्न घेण्याचे तंत्र अवगत केले. कृषी विभाग व विद्यापिठाकडूनही मिळत असलेल्या मार्गदर्शनाचा फायदा झाला आहे. - भरत पेवेकर, कुडावळे, दापोली

अधिक वाचा: Young Farmer Success Story : कॉम्प्युटरवरील अमोलची बोटे चाखता आहेत गुऱ्हाळातील गुळाचा गोडवा

टॅग्स :शेतकरीभाज्याशेतीपीकपीक व्यवस्थापनरत्नागिरी